इंडियन प्रीमियर लीगचा मुंबई इंडियन्स संघ सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामना गाठणारा पहिलाच संघ ठरला आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभूत करत त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली. यासह मुंबईने या हंगामात आतापर्यंत एकूण १५ सामने खेळले असून त्यांतील १० सामने जिंकले आहेत. तर केवळ ५ सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला. मात्र मुंबईच्या या यशाच्या पडद्यामागे कर्णधार रोहित शर्माचे अपयश झाकले जात आहे.
मुंबई हिट पण रोहित फ्लॉप
आयपीएल २०२०च्या हंगामात ‘हिटमॅन’ रोहितची फलंदाजी हवी तशी कामगिरी करताना दिसली नाही. त्याने या हंगामात ११ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४.००च्या सरासरीने आणि १२६.३१च्या स्ट्राईक रेटने केवळ २६४ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने फक्त २ अर्धशतके लगावली आहेत. तर गुरुवारी दिल्ली संघाविरुद्ध झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पहिल्या क्वालिफायर सामन्यात तर तो गोल्डन डकवर ( पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद) बाद झाला.
सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम
दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात सलामीला फलंदाजी येत गोल्डन डक झाल्यानंतर एक नकोसा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही १३ वी वेळ होती. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाच्या यादीत संयुक्तपणे अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापुर्वी पार्थिव पटेल आणि हरभजन सिंग हेदेखील प्रत्येकी १३ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.
संघ जबरदस्त कामगिरी करत असताना कर्णधार मात्र मागे
मुंबई संघातील जवळपास सर्वच खेळाडू सध्या चांगली कामगिरी करत आहेत. इतर संघांच्या तुलनेत मुंबई एक भक्कम व मजबूत संघ वाटत आहे. १५ सामने खेळलेल्या मुंबईने या हंगामात २५ खेळाडूंपैकी केवळ १५ खेळाडूंना प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याची संधी दिली. जिथे इतर संघांनी हा आकडा २०च्या पुढे नेला आहे तिथे मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनवर मोठा विश्वास दाखवला. रोहित संघात नसतानाही पोलार्डच्या नेतृत्त्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली आहे. तसेच रोहितने चांगली कामगिरी केली नसलेल्या सामन्यातही संघाने विजय मिळवला आहे. अशातच रोहितला दुखापतीने काही सामने खेळता आले नाहीत. याचा परिणाही त्याच्या कामगिरीवर झालेला दिसतोय.
अन्य कर्णधारांच्या तुलनेत रोहितच्या कामगिरीची चर्चा होताना दिसत नाही
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला आलेल्या अपयशामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. या हंगामात बेंगलोरकडून ४६६ धावा करणाऱ्या विराटच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असते. त्यालाही एखाद्या सामन्यात चांगला खेळ न केल्यावर चाहत्यांनी फैलावर घेतले आहे. अगदी स्टिवन स्मिथ, डेविड वॉर्नर, दिनेश कार्तिक किंवा ऑयन मॉर्गनच्याही खराब कामगिरीची मोठी चर्चा झाली. परंतू मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करत असताना रोहितच्या खराब फॉर्मची चर्चा मात्र होताना दिसत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये व्यस्त असताना दुबईतच दोन शिलेदारांनी सुरू केला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सराव
“रिषभ पंत कधीही धोनी होऊ शकत नाही”, पाहा कोण म्हणतंय
“ऋतुराज गायकवाडमध्ये दिसते विराट कोहलीची झलक”
ट्रेंडिंग लेख-
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा