येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आले आहे, तर वनडे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आले आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून तो टी२० सह वनडे संघाची देखील जबाबदारी पार पाडणार आहे. दरम्यान, वनडे संघाच्या कर्णधारपदाचा स्वीकार केल्यानंतर रोहित शर्माने माजी कर्णधार विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाचे गुणगान गात रोहित शर्मा म्हणाला की, “त्याने संघाला अशा स्थितीत नेले आहे, जिथून संघाला मागे पडणे अशक्य आहे. गेल्या ५ वर्षांत त्याने जेव्हा जेव्हा संघाचे नेतृत्व केले आहे, तेव्हा त्याने समोर येऊन प्रत्येक गोष्टीचा सामना केला आहे. त्याच्यात प्रत्येक सामना जिंकण्याचा विश्वास दिसून आला होता. हा संपूर्ण संघासाठी एक संदेश देखील होता. मी विराट कोहलीसोबत बरेच वर्ष क्रिकेट खेळलो आणि आम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. भविष्यातही असेच कार्य करत राहणार आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “भारतीय संघ भविष्यात एक मजबूत संघ असेल. हे लक्ष्य भविष्यातही कायम राहील.”
रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपासून उपकर्णधारपद देण्यात आले आहे. परंतु ,दुखापतीमुळे तो ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर झाला आहे.
रोहित शर्मा संघाबाहेर झाल्यानंतर त्याच्या ऐवजी प्रियांक पांचालला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पुढील उपकर्णधार कोण असेल, याबाबत निर्णय घेण्यात आला नाहीये. त्याची दुखापत पाहता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, तो दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतूनही बाहेर होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या :
‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेने शोधला नवा गुरू, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी लयीत परतण्यासाठी घेतले कानमंत्र
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय