ॲडलेड कसोटीत भारताचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं आपल्या चुका मान्य केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं आमच्यापेक्षा चांगलं क्रिकेट खेळल्याचं तो म्हणाला. गुलाबी चेंडूच्या या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक निराशा केलं. संपूर्ण सामन्यात टीम इंडियाकडून एकही फलंदाज 50 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. कर्णधार रोहितची वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक होती. त्याला ॲडलेड कसोटीच्या दोन्ही डावात मिळून केवळ 9 धावा करता आल्या.
सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मानं टीम इंडियाचा पराभव स्वीकारला. तो म्हणाला, “साधी गोष्ट आहे की आम्ही चांगलं खेळू शकलो नाही. ऑस्ट्रेलिया प्रत्येक क्षेत्रात आमच्यापेक्षा सरस होता. सामन्यात काही संधी आल्या ज्याचा आम्हाला फायदा घ्यायला हवा होता. तसं झालं नाही. आम्ही पर्थमध्ये जे काही केलं ते विशेष होतं. आम्ही त्याच उद्देशानं ॲडलेडला आलो होतो. पण आम्हाला माहित होतं की गुलाबी चेंडूची कसोटी आमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.”
रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पर्थ कसोटीत खेळू शकला नाही. त्यानं मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केलं. रोहितनं पर्थ कसोटीत 26 आणि 77 धावांची खेळी खेळणाऱ्या केएल राहुलकडे सलामीची जागा सोपवली. राहुल सलामीला आला, त्यामुळे रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहितची आकडेवारी चांगली आहे. त्यानं आतापर्यंत सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या 27 डावांमध्ये 49.8 च्या उत्कृष्ट सरासरीनं 1046 धावा केल्या आहेत. परंतु ॲडलेड कसोटीत तो केवळ 3 आणि 6 धावा करू शकला.
आता भारतासमोर गाबा कसोटीचं आव्हान असेल. मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर होणार असून, आजपर्यंत जगातील केवळ 4 संघ ऑस्ट्रेलियाला या मैदानावर पराभूत करू शकले आहेत. हे तेच मैदान आहे जिथे 2021 साली रिषभ पंतनं 89 धावांची इनिंग खेळून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
हेही वाचा –
IND vs AUS; लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला WTCच्या गुणतालिकेत मोठा फटका
इंग्लंडने 323 धावांनी उडवला न्यूझीलंडचा धुव्वा! WTCच्या अंतिम शर्यतीतून न्यूझीलंड बाहेर
आयपीएलच्या ‘या’ 3 हंगामात चमकली संजू सॅमसनची बॅट, पाडला धावांचा पाऊस!





