भारतीय वनडे व टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि हरभजन सिंगने इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान चर्चा केली. यादरम्यान रोहितला अव्वल ५ भारतीय फलंदाजांची निवड करण्यास सांगितली होती. यानंतर त्याने ५ आधुनिक दिग्गज फलंदाजांना निवडण्याचा निर्णय घेतला होता.
रोहितने निवडलेल्या या यादीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. या यादीत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांसारख्या महान खेळाडूंचा समावेश नाही. याचे कारण सांगताना रोहित म्हणाला की, या यादीत केवळ त्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांना त्याने खेळताना पाहिले आहे.
रोहित आपल्या ५ फलंदाजांबद्दल बोलताना म्हणाला की, “जेव्हा मी लहान होतो, तेव्हा मी सचिनशिवाय (Sachin Tendulkar) इतर कोणत्याही खेळाडूला खेळताना पाहिले नव्हते. त्यानंतर मी इतर फलंदाजांचे अनुकरण करायला सुरुवात केली. राहुल (Rahul Dravid) भाईने २००२च्या इंग्लंडमधील मालिकेत अनेक शतके केली होती. मला वाटते त्या मालिकेत खूप चांगले खेळाडू होते.”
“सेहवाग (Virender Sehwag) भाईचा मी यादीत समावेश केला आहे. ज्या प्रकारे त्याने सलामीला फलंदाजी केली आहे, त्यामुळे गोलंदाजांचा आत्मविश्वास थेट कमी व्हायचा. त्यानंतर नक्कीच लक्ष्मण (VVS Laxman) आणि गांगुलीही (Sourav Ganguly) यामध्ये सामील आहे,” असे रोहित यावेळी म्हणाला.
रोहितने या लाईव्ह चॅटमध्ये आपल्या मनातील गोष्ट सांगितली की, “आम्ही एक संघ म्हणून तीनपैकी कमीत कमी २ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होऊ, असे माझा वैयक्तिक उद्देश आहे.” यावेळी त्याने २०२० आणि २०२१ मधील टी२० विश्वचषकातील आणि २०२३ मधील वनडे विश्वचषकाचाही उल्लेख केला.
रोहितने भारताकडून आतापर्यंत ३२ कसोटी सामने, २२४ वनडे सामने आणि १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ४६.५४ च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. तर वनडेत ४९.२७ च्या सरासरीने ९११५ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २९ शतके आणि ४३ अर्धशतके केली आहेत.
याव्यतिरिक्त टी२०त त्याने ३२.६२ च्या सरासरीने २७७३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच
करियरमधील १०० टक्के सामने सचिनसोबत खेळलेला हा होता एकमेव क्रिकेटपटू
-पंचांच्या निर्णयाला विरोध करत सामना खेळण्यास नकार देणारे ५ खेळाडू