अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जात आहे. अशातच कसोटीचा पहिला दिवस हा पूर्णपणे भारतीय संघाने गाजवला. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फिरकीपटू अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्या जोडीने इंग्लंड संघाचा डाव अवघ्या ११२ धावांवर संपवला. अशातच भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आणखी काही विक्रमांना गवसणी घातली आहे.
रोहित शर्माने केलेले विक्रम
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाच्या धावा ३ बाद ९९ इतक्या आहेत. सलामीवीर रोहित (५७ धावा) आणि अजिंक्य रहाणे (१ धावा) मैदानावर उपस्थित आहेत. अशातच पहिल्या डावात अर्धशतक झळकावत रोहितने मायदेशात ६००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. हा कारनामा करणारा तो ९ वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
त्याच्यापुर्वी सचिन तेंडुलकर (१४१९२ धावा ) विराट कोहली (९६८८ धावा), राहुल द्रविड़ (९००४ धावा), विरेंद्र सेहवाग (७७९६ धावा), महेंद्र सिंग धोनी (७५७५ धावा), मोहम्मद अजहरुद्दीन (६५७५ धावा), सौरव गांगुली (६४१० धावा), सुनील गावस्कर (६२५९ धावा) यांनी देखील हा कारनामा केला आहे.
मायदेशात ६००० आंतरराष्ट्रीय धावांसोबतच रोहितने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. तो कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि टी -२० क्रिकेटमध्ये २५०० पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी हा कारनामा विराट कोहली आणि मार्टिन गप्टील यांनी केला आहे.
तसेच सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माला १००० धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या १०० धावांची गरज आहे. त्याच्या नावे १० डावात ९०० पेक्षा अधिक धावा आहेत. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेने १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
पहिल्या डावात अक्षर आणि आश्विन यांचा बोलबाला
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनतर ईशांत शर्माने इंग्लंड संघाला सुरुवातीलाच पहिला झटका दिला. त्याने डॉम सिबलीला लवकर माघारी पाठवले. त्यांनतर अक्षर पटेलने गोलंदाजीला येऊन इंग्लंड संघाच्या ६ फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर आर अश्विनने ३ गडी बाद केले. तर ईशांत शर्माला देखील पुन्हा एक गडी बाद करण्यात यश आले. अशाप्रकारे भारतीय संघाने इंग्लंड संघाचा डाव अवघ्या ११२ धावांवर संपवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी रंग बदलणार नाही, कारण…’ मास्टर ब्लास्टरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य
जब मिलेंगे तीन यार…! माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने शेअर केला खास फोटो