3 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर पार पडणार आहे. पण या सामन्याआधी सराव करताना भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या पायाला चेंडू लागला असल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
आज(1 नोव्हेंबर) रोहित भारताचे थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने विरुद्ध फलंदाजी करत असताना त्याच्या डाव्या मांडीला चेंडू लागला. त्यानंतर रोहित लगेचच सराव सत्रातून बाहेर गेला. त्याला हा चेंडू सराव सत्राच्या सुरुवातीलाच लागला.
रोहितची ही दुखापत गंभीर नसल्याची शक्यता आहे. कारण त्याला चेंडू लागल्यानंतर चालताना त्रास होत नव्हता. परंतू कदाचित त्याने खबरदारी घेण्यासाठी सराव सत्र सोडले असण्याची शक्यता आहे. पण अजून बीसीसीआयकडून याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
संघाच्या एका सुत्राने पीटीआयला रोहितच्या दुखापतीबद्दल सांगितले आहे की ‘रोहितला उपचार दिले जात आहेत आणि आम्ही तूम्हाला तपशील मिळाला की माहिती देऊ.’
भारताने फलंदाजांना डावकरी वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली तयारी करता यावी यासाठी सेनेविरत्ने यांची थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून नियुक्ती केली आहे.
बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी रोहित शर्मा या टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे.






