भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार व अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याच्यासाठी इंग्लंडमध्ये झालेला २०१९ वनडे विश्वचषक संस्मरणीय ठरला होता. रोहितने या विश्वचषकात तब्बल ५ शतके झळकावत विश्वविक्रम नोंदवलेला. मात्र, त्या शतकांबाबत आता रोहितकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
रोहितचा महत्त्वपूर्ण खुलासा
वरिष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार आणि कुशन सरकार यांच्या ‘मिशन डॉमिनेशन’ या पुस्तकात रोहित शर्माच्या विश्वचषका नंतरच्या मनस्थितीविषयी लिहिण्यात आले आहे. त्या पुस्तकानुसार,
‘जेव्हा आम्ही २५ फेब्रुवारी २०२० रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रोहितला भेटलो तेव्हा तो अस्वस्थ होता. न्यूझीलंड दौरा सुरू होण्याआधीच हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित दौऱ्याबाहेर गेलेला. रोहित उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने या दौऱ्याच्या काही महिने आधीच विश्वचषकात पाच शतके केली होती.’
त्या शतकांनी मला फरक पडला नाही
या पुस्तकानुसार, रोहितने विश्वचषकातील पाच शतकांबद्दल बोलताना म्हटले,
”प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्या पाच शतकांनी मला फरक पडला नाही. वैयक्तिकरित्या खेळाडू म्हणून ही एक मोठी उपलब्धी होती. परंतु, जेव्हा तुम्ही सांघिक खेळ खेळता, तेव्हा तुमच्या वैयक्तिक कामगिरीला तितकेसे महत्त्व राहत नाही.’
रोहित पुढे म्हणाला,
‘जेव्हा मी विश्वचषकानंतर घरी परतलो, तेव्हा प्रत्येकजण माझे पाच शतकांसाठी अभिनंदन करत होता. खरं सांगू, मला त्याचे काहीच वाटले नाही. खरे बक्षीस इंग्लंडमधील ड्रेसिंग रूममध्ये होते आणि आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो नाही हे पचवणे आमच्यासाठी कठीण होते.’
भारतीय संघाचा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. हा सामना भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. रोहितने आपल्या फलंदाजीने संपूर्ण विश्वचषक दणाणून सोडत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड व बांगलादेश विरुद्ध शतके ठोकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
“ॲलिस्टर कूक अजूनही सलामीसाठी योग्य पर्याय”, दिग्गज इंग्लिश फलंदाजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर
‘त्या’ कृत्यासाठी अनेक वर्षानंतर मार्क बाऊचरला मागावी लागली माफी
वयाच्या १९ व्या वर्षी सचिनने रचलेला लीड्सवर इतिहास, याच मैदानावर रंगणार तिसरी कसोटी