भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. हे दोन्ही सामने जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2025-27चा (WTC) भाग आहेत. या निमित्ताने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांची यादी पाहू. भारताचे स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही रेड-बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, ते या यादीत अजूनही पहिल्या पाचमध्ये आहेत. तसेच या यादीत इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि माजी कर्णधार बेन स्टोक्स यांचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाला WTC चे विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार पॅट कमिन्स या यादीत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या पहिल्या पाच कर्णधारांची आकडेवारी जाणून घेऊ,
पॅट कमिन्स
कमिन्स हा WTC च्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 38 सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून, ऑस्ट्रेलियाने त्यापैकी 24 सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया केवळ आठ सामने हरला, तसेच सहा सामने अनिर्णीत राहिले. WTC मध्ये त्याच्या विजयाची टक्केवारी 63.15 आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने WTC चे एक विजेतेपदही पटकावले आहे.
विराट-रोहित टॉप 5 मध्ये
WTC च्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांची यादी पाहिली तर त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे पण उपस्थित आहेत. या स्पर्धेत विराटने 22 सामन्यांमध्ये भारताने नेतृत्व केले. त्यापैकी 14 सामने जिंकले, 7 गमावले आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्याच्या विजयाची टक्केवारी सर्वाधिक अशी 63.63 असून, तो WTC च्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
रोहितने WTC मध्ये भारताचे 24 सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्यापैकी 12 सामने जिंकले, 9 गमावले आणि 3 सामने अनिर्णीत राहिले. त्याच्या विजयाची टक्केवारी 50 आहे.
त्याचबरोबर रोहित आणि विराट यांच्या नेतृत्वाखाली भारत WTC च्या अंतिम सामन्यात खेळला, मात्र भारत पहिल्या वेळी न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्या वेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.
सध्या भारताचा कर्णधार शुभमन गिल असून त्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामने जिंकले, 3 गमावले आणि एक सामना अनिर्णीत राहिला.
इंग्लंडच्या दोन कर्णधारांचाही यादीत समावेश
WTC च्या इतिहासात कर्णधार म्हणून बेन स्टोक्सने सर्वाधिक 40 सामने खेळले. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने WTC चे 21 सामने जिंकले, 17 गमावले आणि दोन सामने अनिर्णीत राहिले. तसेच जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 33 पैकी 12 सामने जिंकले. यामुळे तो यादीत चौथ्या स्थानी आहे. (Rohit sharma Virat Kohli still in top 5, Pat Cummins at number one; captains with most wins in WTC)
WTC च्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारे पहिले पाच कर्णधार
पॅट कमिन्स – 24 विजय (38 सामने)
बेन स्टोक्स – 21 विजय (40 सामने)
विराट कोहली – 14 विजय (22 सामने)
जो रूट – 12 विजय (33 सामने)
रोहित शर्मा – 12 विजय (24 सामने)






