मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुंबई इंडियन्सने चांगल्या सुरुवातीनंतर क्विंटॉन डिकॉक आणि रोहित शर्माच्या लवकर विकेट्स गमावल्या.
डिकॉक २३ धावांवर तर रोहित २३ चेंडूत ३५ धावा करुन बाद झाला. रोहितला लेगस्पिनर श्रेयस गोपाळने बाद केले. रोहितची आयपीएलमध्ये २०१७ पासून लेग स्पिनविरुद्ध बाद होण्याची ही दहावी वेळ होती. त्याने २०१७ पासून आयपीएलमध्ये लेग स्पिनरच्या १४० चेंडूंचा सामना केला असून १५.४० च्या सरासरीने आणि ११० च्या स्ट्राईक रेटने त्याने १५४ धावा लेगस्पिनरविरुद्ध केल्या आहेत.
तसेच आयपीएमध्ये २०१७ पासून लेग स्पिनविरुद्ध सर्वाधिकवेळा बाद होणारा तो शिखर धवननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. शिखरही लेग स्पिनविरुद्ध २०१७ पासून आयपीएलमध्ये १३ वेळा बाद झाला आहे.