यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून भारतीय संघाला पराभूत केले होते. रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला होता. सूर्यकुमार यादवऐवजी ईशान किशनला संघात स्थान देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर केएल राहुलसोबत रोहित शर्मा नव्हे तर ईशान किशनला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली होती. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य झाले होते. हा निर्णय कोणी घेतला होता? याबाबतचा खुलासा फलंदाजी प्रशिक्षकांनी केला आहे.
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटले की, “तर झाले असे की, सामना सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार यादवला पाठीची दुखापत झाली, त्यामुळे तो पूर्णपणे फिट नव्हता. त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी दिली जाणार होती. आम्हाला माहीत आहे की, तो सलामीवीर फलंदाज म्हणून एक चांगला फलंदाज आहे. हे त्याने मागील काही सामन्यांमध्ये दाखवले आहे. ईशान किशनला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापकांनी घेतला होता. या चर्चेत रोहित शर्मा देखील सहभागी होता.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “ईशान किशनला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवणे हा एक योग्य निर्णय होता. आम्हाला खालच्या फळीत ईशान किशन, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजासारखे डाव्या हाताचे इतके फलंदाज नको आहेत. आमच्याकडे पुरेसे खेळाडू आहेत जे चांगली भूमिका बजावू शकतात आणि त्यांनी यापूर्वीही असे केले आहे. आम्ही याला समस्या म्हणून पाहत नाही.”
आयपीएलमुळे आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या कामगिरीवर परिणाम
विक्रम राठोड यांच्या मते, आयपीएल स्पर्धा आणि आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनात खूप कमी अंतर असल्यामुळे खेळाडूंवर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत बोलताना विक्रम राठोड म्हणाले की, “तयारी ही नेहमीच चांगली असते. मला वाटते की, आयपीएल तुम्हाला एक चांगले व्यासपीठ तयार करून देते जिथे तुम्ही जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळत असता. आयपीएलनंतर विश्वचषक खेळण्यात मला कोणतीही अडचण दिसून येत नाही. आमच्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे योजना अमलात आणणे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘जितने की आदत हो गयी है’, पाकिस्तानच्या विजयी ‘चौकारा’नंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर
विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!
जे भारतालाही नाही जमलं, ते पाकिस्ताननं केलं; ‘इतक्या’ वेळेस गाठली टी२० विश्वचषकाची सेमीफायनल