मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आघाडीच्या फळीतील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियानं 86 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत. गुरुवारी सुरू झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या फलंदाजांनी आतापर्यंत हा निर्णय योग्य राहिल्याचं सिद्ध केलंय.
या सामन्यात भारतीय संघ एका बदलासह उतरला आहे. शुबमन गिलच्या जागी फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. आता भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करणार असल्याची पुष्टी केली आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर नायरनं पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली. नायर म्हणाला, “रोहित यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करेल. तर तीन सामन्यात सलामीवीर म्हणून खेळलेला केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.”
कर्णधार म्हणून रोहित शर्मावर सध्या खूप दडपण आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. प्रथम न्यूझीलंडविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे.
अभिषेक नायरनं शुबमन गिलला संघातून वगळण्याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. नायर म्हणाला, “आम्ही गिलला ड्रॉप केलेलं नाही. तो फक्त कॉम्बिनेशनमुळे संघात स्थान मिळवू शकला नाही. खेळपट्टी पाहून आम्हाला वाटलं की येथे वॉशिंग्टन सुंदरची जास्त गरज आहे. केएल राहुल त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.”
हेही वाचा –
19 वर्षाच्या पोरानं जे केलं, ते बुमराह कधीच विसरणार नाही! करिअरमध्ये असं प्रथमच घडलं
कोहलीसोबतच्या बाचाबाचीवर सॅम कॉन्स्टासची प्रतिक्रिया, म्हणाला, “कोहलीनं जाणूनबुजून…”
‘अरे जैस्सू…’, क्षेत्ररक्षणा दरम्यान रोहित शर्मा जयस्वालला झापला, पाहा VIDEO