---Advertisement---

हाच कर्णधार हवा! नेतृत्व करताना रोहितची अफलातून आकडेवारी, वाचा सविस्तर

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 1:25 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी माध्यमांद्वारे समोर येत आहे. त्याच्या जागी वनडे व टी२० संघाचा कर्णधार म्हणून अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची वर्णी लागू शकते. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यात याआधी देखील रोहितने भारताचे नेतृत्व केले असून, त्याची कर्णधार म्हणून कामगिरी अफलातून राहिली आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी
रोहितने भारतीय संघाचे आतापर्यंत २९ सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्यापैकी २३ मध्ये संघाने विजय मिळवला, तर केवळ ६ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. रोहित खेळाडूंना दबावाखालीही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसला आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला १५ टी२० सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला असून, टी२० मध्ये भारताचा तो तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

एमएस धोनीने ४१ आणि विराट कोहलीने २७ टी२० सामने भारताला जिंकून दिले आहेत. रोहितने आतापर्यंत १९ टी२० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून, त्यापैकी केवळ ४ सामन्यात भारताने पराभव पाहिला आहे. वनडे सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. तो कर्णधार असताना भारत केवळ दोन सामन्यात पराभूत झाला आहे. रोहितच्या कर्णधार म्हणून आंतराष्ट्रीय विजयाची टक्केवारी ही तब्बल ८० % अशी राहिलीये.

आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार
जगातील सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. सन २०१३ पासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना त्याने संघाला तब्बल ५ विजेतेपदे मिळवून दिली आहेत. २०१९ व २०२० अशी सलग दोनदा आयपीएल जिंकल्यानंतर रोहित व मुंबई इंडियन्स लक्ष विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याकडे असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---