भारतीय कसोटी संघ काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात दिवंगत माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मांच्या सन्मानार्थ दंडाला काळी पट्टी बांधून मैदानावर उतरला होता. तर कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाने यशपाल यांच्या निधनाकडे दुर्लक्ष करत कोणतीही गोष्ट केली नाही, याबद्दल माजी भारतीय खेळाडूने नाराजी व्यक्त केली आहे. यशपाल शर्मा यांनी भारताकडून 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले होते. त्याचबरोबर 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा देखील ते भाग होते.
यशपाल यांचे वयाच्या 66 व्या वर्षी 13 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये खेळणाऱ्या संघाने यशपाल यांचा आदर करण्यास उशीर केला नाही. त्यांनी अगदी सराव सामन्यात हाताला काळी पट्टी बांधत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मात्र प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत खेळणाऱ्या मर्यादित षटकांच्या भारतीय संघाने दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य बलविंदर सिंग संधू यांनी याबाबत निराशा व्यक्त केली आहे.
संधू म्हणाले की, ‘ही खूप चुकीची गोष्ट आहे की, एका संघाने काळी पट्टी बांधली. तर, दुसऱ्या संघाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हे दोन्ही भारतीय संघ आहेत. मग या दोन्ही संघाने काळी पट्टी बांधणे गरजेचे होते. अजूनही भारतात क्रिकेट जिवंत आहे. यामागचे कारण माजी क्रिकेटपटूंनी दिलेले योगदान आहे. त्याचबरोबर यशपाल यांनी 1983 विश्वचषक विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते.’
यशपाल यांचे साथीदार खेळाडू कीर्ती आझाद यांनीदेखील यावर निराशा व्यक्त केली आहे. आझाद म्हणाले की, ‘भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाने काळी पट्टी न बांधल्याने मला आश्चर्यच वाटले. यशपाल हे एक महान क्रिकेटपटू होते. कोणी इतकं असंवेदनशील कसं काय असू शकतं. मला सर्वात जास्त या गोष्टीचे आश्चर्य वाटले की राहुल द्रविडसारख्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालील संघाने काळी पट्टी बांधली नाही.’
https://twitter.com/BCCI/status/1417425363521753133
यशपाल शर्मा हे एक उत्तम व्यक्तिमत्व असणारे क्रिकेटपटू होते. त्याचबरोबर भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्यांना “क्रायसिस मॅन फॉर इंडिया” असे टोपणनाव दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय धुरंधर सूर्यकुमार यादव उत्कृष्ट कामगिरी करूनही आहे नाराज, स्वतः सांगितले त्यामागचे कारण
अरेरे! रोहितच्या आवडत्या शॉटनेच केला गेम, सराव सामन्यात ‘असा’ झाला दुर्दैवीपणे बाद





