भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सलामीवीर फलंदाज रोहित भारतीय संघातील नियमित सदस्य आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकदा मोठ्या खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहे. रोहितला आत्ता जरी मोठे यश मिळाले असले, तरी त्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत.
रोहितचा जन्म 30 एप्रिल, 1987 रोजी अर्थिकदृष्ट्या गरीब घरात नागपूरला झाला. पण तो लहान असतानाच त्याचे पालक मुंबईला स्थलांतरित झाले. पण त्यांना 2 मुलांचा खर्च उचलणे शक्य होत नसल्याने रोहित अनेकदा त्याच्या आजी-आजोबांकडे आणि काकांकडे राहिला.
रोहितने जेव्हा दिनेश लाड यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्याला शाळा बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्याला स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सुचवले. कारण तिथे सरावासाठी आणि प्रशिक्षणासाठी चांगल्या सुविधा होत्या.
पण सुरुवातीला रोहित यासाठी टाळाटाळ करत होता. कारण त्याला माहित होते की नवीन शाळेत जायचे म्हणजे अर्थिक समस्या निर्माण होणार आणि त्याच्या कुटुंबाला शाळेची फी भरणे शक्य होणार नाही.
त्यावेळी दिनेश लाड त्याच्या मदतीला आले. लाड यांनी रोहितसाठी शिष्यवृत्ती मिळेल याची सोय केली. त्यामुळे पुढील 4 वर्षे त्याला फी भरण्यास सूट देण्यात आली होती.
एवढे असूनही रोहितने त्याची क्रिकेटची आवड जोपासत एक यशस्वी कारकीर्द घडवली. विशेष म्हणजे लहानपणी गरिबी पाहिलेला रोहित आता 30 कोटींच्या घरात वरळीमध्ये राहतो.