भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. त्याची ही दुखापत सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चिली जातेय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याच्या उपलब्धतेविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. रोहित या ‘हाय व्होल्टेज’ मालिकेत खेळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्याच अनुषंगाने, भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने या विषयावर आपले मत मांडले. रोहित पूर्ण तंदुरुस्त असेल तर, त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावे, असे सचिनने म्हटले आहे.
…तर रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवावे
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिनने रोहित विषयीच्या प्रश्नाला उत्तर दिले. तो म्हणाला,
“रोहित पूर्ण तंदुरुस्त असेल तर त्याने ऑस्ट्रेलियात असायला हवे होते. त्याच्यासारखा खेळाडू बाहेर राहता कामा नये. तो सगळ्या पातळ्यांवर खरा उतरत असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात यावे. मला त्याच्या दुखापती विषयी पूर्ण माहिती नाही. बीसीसीआय आणि रोहित एकमेकांच्या संपर्कात असतीलच. सोबतच संघ व्यवस्थापन व फिजीओंसोबत त्यांची चर्चा होत असेल.”
भारताच्या तरुण खेळाडूंची फळी सक्षम
रोहितच्या समावेशावर टांगती तलवार असताना आणि कर्णधार विराट कोहली तीन कसोटीसाठी उपलब्ध नसल्याने, त्याचा भारतीय संघावर परिणाम होईल का? या प्रश्नाचे उत्तर देताना सचिन म्हणाला,
“भारताचे तरुण खेळाडू सध्या जगातील सर्वात प्रतिभावंत खेळाडू आहेत. ते देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतात. विराट नसल्याने नक्कीच फरक पडेल. मात्र, आपण एक संघ म्हणून खेळणार आहोत हे लक्षात ठेवावे लागेल.”
रोहितला झाली होती दुखापत
आयपीएल २०२० दरम्यान रोहित शर्माला हॅमस्ट्रींगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन साखळी सामन्यांना मुकला होता. त्यानंतर, अंतिम सामन्यासह तीन सामने खेळत त्याने मुंबईला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. आयपीएलदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश नव्हता. मात्र, या निवडीवरून वाद झाल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला. सध्या तो बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. रोहित अजूनही भारतात असल्याने, त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणे अवघड झाले आहे.
संबंधित बातम्या:
– हम तो उड गए, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
– रोहितच्या निवडीवरून झालेल्या वादात भारतीय दिग्गजाची उडी, विराटचे केले समर्थन
– रोहित खोलीच्या बाहेरही येऊ शकत नाही, भारतीय दिग्गजांचे बीसीसीआयवर ताशेरे