आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात धमाकेदार झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या 7 षटकांत 80 धावा ठोकल्या. रोहित 27 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. त्या पाठोपाठ किशनही 23 चेंडूत 42 धावा ठोकून परतला. लागोपाठ विकेट पडल्यानंतर एकवेळ मुंबईची टीम अडचणीत सापडली होती. मात्र शेवटच्या 4 षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी कमबॅक करत दिल्लीच्या गोलंदाजांचा पार धुव्वा उडवला.
मुंबईसाठी सर्वात मोठा हिरो ठरला तो रोमॅरियो शेफर्ड. त्यानं शेवटच्या षटकात 32 धावा ठोकत मुंबई इंडियन्सला 234 धावांपर्यंत नेलं. एकवेळ मुंबईला 215 धावांचा आकडा गाठणंही अवघड आहे, असं वाटत होतं. परंतु शेफर्डनं असा काही चमत्कार केला, जे पाहून वानखेडे स्टेडियमवरील सर्वच जण हैराण झाले.
19 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या 5 विकेट्सवर 202 धावा होती. दिल्लीसाठी ॲनरिक नॉर्किया शेवटचं षटक टाकण्यासाठी आला. क्रिजवर होता रोमारियो शेफर्ड. त्यानं पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून ओव्हरची शानदार सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकारांची हॅट्ट्रिक मारून पार वाभाडं काढलं. पहिल्या 4 चेंडूत 22 धावा आल्या होत्या. मात्र शेफर्ड एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा षटकार मारून एकूण 32 धावा केल्या. ॲनरिक नॉर्कियानं सामन्यात 2 विकेट घेतल्या, परंतु त्यानं 4 षटकात 65 धावा दिल्या.
15 व्या षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या 4 गडी बाद 138 धावा होती. इथून त्यांना 200 धावांपर्यंत मजल मारणं कठीण वाटत होतं. पण इथून टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्डच असं वादळ आलं की पुढच्या 5 षटकात मुंबईच्या फलंदाजांनी 96 धावा ठोकल्या. या शेवटच्या 5 षटकांमध्ये मुंबई इंडियन्सनं 9 गगनचुंबी षटकार ठोकले. जर आपण संपूर्ण डावावर नजर टाकली तर मुंबईच्या फलंदाजांनी 14 षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माचा भीम पराक्रम! असं करणारा केवळ दुसरा भारतीय
‘तेरे जैसा यार कहां…’, वानखेडेवर पुन्हा भेटले सचिन-सौरव; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
विराट कोहलीच्या शतकावर भारी जोस बटलरचं शतक! राजस्थान रॉयल्सचा आरसीबीवर शानदार विजय