लीड्स येथील प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात कर्णधार जो रूटने शानदार शतकी खेळी करत यजमानांना सामन्यात वर्चस्व मिळवून दिले. आपल्या कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक पूर्ण करताना त्याने या वर्षीचा आपला अफलातून फॉर्म कायम राखला. याचबरोबर रूटने एकाच वर्षात सलग तीन कसोटीत शतके ठोकण्याची कामगिरी केली.
रूटचे आणखी एक दमदार शतक
हेडिंग्ले या आपल्या घरच्या मैदानावर खेळताना रूटने दोन्ही सलामीवीर पाठोपाठ माघारी परतल्यानंतर शानदार फलंदाजी केली. आधी डेविड मलान व त्यानंतर जॉनी बेअरस्टो यांच्यासोबत त्याने महत्त्वपूर्ण भागीदार्या केल्या. त्याने कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली. १२१ धावांवर जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचीत केले.
एका वर्षात केली दोनदा खास कामगिरी
या शतकासह सलग तीन कसोटी सामन्यात शतके झळकावण्याची कामगिरी रूटने एका वर्षात दुसऱ्यांदा केली. रूटने २०२१ च्या सुरुवातीला श्रीलंका दौऱ्यावर गाले येथील दोन्ही कसोटीत अनुक्रमे २२८ व १८६ अशी मोठी शतके साजरी केली होती. त्यानंतर, भारत दौऱ्यावरील पहिल्याच चेन्नई कसोटीत त्याने २१८ धावांची लाजवाब खेळी केली होती.
त्यानंतर आता मायदेशातील भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने शतके झळकावली. नॉटिंघम कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने १०९, लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद १८० व आता हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने १२१ धावांची खेळी केली. रूट या मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने तीन सामन्यांच्या पाच डावात १०० पेक्षा जास्तच्या सरासरीने ५०० हून अधिक धावा जमवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी
जो रूट एक्सप्रेस सुस्साट! इंग्लंडच्या कर्णधाराचे तुफानी शतक; मोडला मियाँदादचा रेकॉर्ड
संधीचं सोनं! तीन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करत मलानचे झुंजार अर्धशतक, त्याचा आनंद तर पाहा