आज भारताविरुद्ध मैदानात पाऊल ठेवताच रॉस टेलरने अनोख्या शतकासह केला विश्वविक्रम

वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. हा सामना न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरसाठी खास ठरला आहे. कारण हा त्याचा 100 वा कसोटी सामना आहे.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 या तीन्ही प्रकारात प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. आत्तापर्यंत असा कारनामा कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेला नव्हता.

2006ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलर आत्तापर्यंत वनडेचे 231 सामने आणि टी20चे 100 सामने खेळले आहेत. त्याने काहीदिवसांपूर्वीच भारताविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 100 टी20 सामने खेळण्याचा टप्पा पार केला होता आणि आता तो 100 वा कसोटी सामना खेळत आहे.

त्याचबरोबर टेलर 100 कसोटी सामने खेळणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडकडून डॅनिएल विट्टोरी, स्टिफन फ्लेमिंग आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांनीच 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

हे देखील घ्या जाणून – 

क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा 100 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या कॉलिन कॉड्रे यांनी केला होता. त्यांनी 1968ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हा कारनामा केला. तसेच कसोटी आणि वनडे या दोन्ही क्रिकेट प्रकारात सर्वात पहिल्यांदा प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याचा इतिहास भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी रचला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 125 कसोटी आणि 108 वनडे सामने खेळले.

न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटपटू – 

112 – डॅनिएल विट्टोरी

111 – स्टिफन फ्लेमिंग

101 – ब्रेंडन मॅक्यूलम

100 – रॉस टेलर

86 – सर रिचर्ड हॅडली

You might also like