वेलिंग्टन। उद्या(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्यापासून बेसिन रिझर्व स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4 वाजता सुरु होईल. हा सामना न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरसाठी खास ठरणार आहे. कारण हा त्याचा 100 वा कसोटी सामना असेल.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 या तीन्ही प्रकारात प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरणार आहे. आत्तापर्यंत असा कारनामा कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेला नाही.
2006ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने सध्या कसोटीमध्ये 99 सामने खेळले आहेत. तर वनडेचे 231 सामने आणि टी20चे 100 सामने खेळले आहेत. त्याने काहीदिवसांपूर्वीच भारताविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 100 टी20 सामने खेळण्याचा टप्पा पार केला होता.
त्याचबरोबर टेलर उद्या 100 कसोटी सामने खेळणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरेल. याआधी न्यूझीलंडकडून डॅनिएल विट्टोरी, स्टिफन फ्लेमिंग आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांनीच 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.
न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटपटू (20 फेब्रुवारीपर्यंत)-
112 – डॅनिएल विट्टोरी
111 – स्टिफन फ्लेमिंग
101 – ब्रेंडन मॅक्यूलम
99 – रॉस टेलर
86 – सर रिचर्ड हॅडली




