मुंबई। मंगळवारी (५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेतील १३ वा सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने ४ विकेट्सने विजय नोंदवला. हा बेंगलोरचा आयपीएलच्या १५ व्या हंगामातील दुसरा विजय ठरला आहे. दरम्यान, या सामन्यात बेंगलोरच्या विजयासह एक गमतीशीर घटनेचीही बरीच चर्चा झाली. ती घटना म्हणजे सामन्यापूर्वी बेंगलोरचे खेळाडू मैदानावर नाचनाता दिसले.
मस्तीच्या मूडमध्ये आरसीबी
राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसले होते. झाले असे की, या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सामन्यापूर्वी बाऊंड्री लाईनजवळ मैदानात जाण्यासाठी बेंगलोरचे खेळाडू एकत्र जमले होते. यावेळी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली डान्स करताना दिसला.
विराटला (Virat Kohli) डान्स करताना पाहून तिथे असलेल्या अन्य खेळाडूंनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही आणि मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनीही डान्स करायला सुरुवात केली. त्यांना बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही साथ दिली. यावेळी दिनेश कार्तिक, अनुज रावत, वनिंदू हसरंगा हे देखील त्यांच्याजवळ उभे होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Royal Challengers Bangalore Virat Kohli was seen doing dance moves on the filed)
https://twitter.com/SlipDiving/status/1511367703826604034
बेंगलोरने जिंकला रोमांचक सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील (RCB vs RR) सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १६९ धावा केल्या आणि बेंगलोरसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानकडून जोस बटलरने ७० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच देवदत्त पडीक्कलने ३७ आणि शिमरॉन हेटमायरने ४२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बेंगलोरकडून डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
यानंतर १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून सलामीवीर फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर बेंगलोरची मधली फळी कोलमडली. त्यामुळे एकवेळ अशी आली होती की, बेंगलोरची अवस्था १३ व्या षटकात ५ बाद ८७ धावा अशी होती. पण, नंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी ६७ धावांची भागीदारी केली.
शाहबाज अहमद ४५ धावांवर बाद झाल्यानंतर कार्तिकने जबाबदारी सांभाळत बेंगलोरला विजय मिळवून दिला. कार्तिकने ७ चौकार आणि १ षटकारासह २३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. तसेच हर्षल पटेलने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विजयी षटकार खेचला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम
RR vs RCB | बेंगलोरचा विजयरथ सुसाट, राजस्थानला ४ विकेट्सने हरवत नोंदवला सलग दुसरा विजय
विराटने घेतला पडीक्कलचा सुपर कॅच, पण नंतर मैदानावर जे झालं ते सिनेमापेक्षा कमी नव्हतं