इंडियन प्रीमिअर लीगमधील एलिमिनेटर हा सामना ज्या संघात खेळला जातो, त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. कारण, या सामन्यात जो विजय मिळवतो, त्यालाच पुढच्या क्वालिफायर सामन्याचे तिकीट मिळते. मात्र, जो हा सामना गमावतो, त्याला स्पर्धेतून थेट बाहेरचा रस्ता धरावा लागतो. आता असाच बाहेरचा रस्ता धरण्याची वेळ आयपीएल २०२२मधील नवखा संघ लखनऊ सुपर जायंट्स यावर आली आहे. आयपीएल २०२२मधील एलिमिनेटर सामन्यात बुधवारी (दि. २५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लखनऊला १४ धावांनी पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयासह बेंगलोरने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात एंट्री घेतली आहे. बेंगलोरच्या या विजयात रजत पाटीदार याचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊच्या कर्णधाराचा हा निर्णय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. बेंगलोरने यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २०७ धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला ६ विकेट्स गमावत १९३ धावाच करता आल्या.
Destination: Ahmedabad. ✈️ ✅ #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #LSGvRCB #PlayOffs
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 25, 2022
लखनऊकडून फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५८ चेंडूत ७९ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त दीपक हुड्डा याने ४५ धावा चोपल्या. या धावा त्याने २६ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या. इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. मनन वोहराने १९ धावांचे योगदान दिले.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना जोश हेजलवूड याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून रजत पाटीदार याने तुफान शतक झळकावले. त्याने अवघ्या ४९ चेंडूत आपले शतक साजरे केले. आपल्या खेळीत त्याने ५४ चेंडूंचा सामना करताना नाबाद ११२ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ७ षटकार आणि १२ चौकारांचाही पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक याने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले, तर विराट कोहली २५ धावा करून बाद झाला. तसेच, ग्लेन मॅक्सवेल १४ आणि महिपाल लोमरोर ९ धावा करून बाद झाले. कर्णधार फाफ डू प्लेसिस याला एकही धाव करता आली नाही. तो गोल्डन डक म्हणजेच शून्य धावसंख्येवर बाद झाला.
यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करताना मोहसिन खान, कृणाल पंड्या, आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या विजयासह बेंगलोर संघ आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला अंतिम सामन्यासाठी आव्हान देणार आहे. हा सामना शुक्रवारी (दि. २७ मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! रजत पाटीदारने गाजवली आयपीएल, लखनऊविरुद्ध ४९ चेंडूत शतक ठोकत रचला भीमपराक्रम
याला काय अर्थय! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीच्या कॅप्टनचा फ्लॉप शो, धोनी- रोहितनंतर फाफची नकोशी कामगिरी