अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विल जॅक्स आणि विराट कोहली यांनी गुजरातच्या गोलंदाजांचा अक्षरश: पाला-पाचोळा केला. जॅक्सनं तुफानी फलंदाजी करत शेवटच्या दोन षटकांत 57 धावा ठोकल्या. या दोघांच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीनं गुजरातचा त्यांच्याच घरात 9 विकेट राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या विजयात अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत.
आरसीबीनं आयपीएलच्या इतिहासात दुसरं सर्वात मोठं आव्हान यशस्वीरित्या गाठलं. विशेष म्हणजे, आरसीबीनं तब्बल 14 वर्षांनंतर 200 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठलं आहे. यापूर्वी संघानं 2010 मध्ये 204 धावांचं लक्ष्य गाठलं होतं.
विल जॅक्सनं आयपीएलच्या इतिहासातील पाचवं सर्वात जलद शतक झळकावलं आहे. त्यानं गुजरातविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. सामन्याच्या शेवटच्या दोन षटकात जॅक्सनं 57 धावा ठोकल्या. त्यानं आधी मोहित शर्मा आणि नंतर राशिद खानचा सामना केला आणि या दोघांच्याही षटकांत 29-29 धावा केल्या. जॅक्सनं राशिदच्या चेंडूवर षटकार ठोकून आपलं शतक पूर्ण केलं.
गुजरातविरुद्ध विल जॅक्सनं पहिल्या 50 धावा 31 चेंडूत पूर्ण केल्या होत्या. त्यानंतरच्या 50 धावा त्यानं अवघ्या 10 चेंडूत ठोकल्या. लीगच्या इतिहासातील हा एक मोठा विक्रम आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जॅक्सनं एकूण 41 चेंडूंचा सामना करत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्यानं 5 चौकार आणि 10 षटकार लगावले.
या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधूनही चांगल्या धावा निघाल्या. कोहलीनं 44 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली. यासह त्यानं आयपीएल 2024 मध्ये 500 धावाही पूर्ण केल्या आहेत. किंग कोहलीनं आयपीएलच्या इतिहासात सातव्यांदा ही कामगिरी केली.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त चेंडू शिल्लक असताना 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आता आरसीबीच्या नावावर नोंदवला गेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 201 धावांचं लक्ष्य 24 चेंडू बाकी असताना गाठलं. याशिवाय आयपीएलमध्ये 200 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य 9 गडी शिल्लक असताना गाठणारी आरसीबी पहिली टीम बनली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
6,6,6,6,6… वादळाचं दुसरं नाव म्हणजे ‘विल जॅक्स’! गुजरातविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत ठोकलं शतक
शाहरुख खानच्या बॅटमधून अखेर धावा निघाल्या! आरसीबीविरुद्ध ठोकलं झंझावाती अर्धशतक