गुरुवारी (२२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्या दरम्यान सोळावा सामना खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून आरसीबीने पुन्हा एकदा अव्वलस्थान काबीज केले. दुसरीकडे राजस्थानला तिसरा पराभव पत्करावा लागला. प्रमुख फलंदाजांचे अपयश हे राजस्थानच्या पराभवाचे प्रमुख कारण राहिले. राजस्थानने पॉवर प्लेमध्ये तीन गडी गमावत एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला.
पॉवर प्लेमध्ये खराब आकडेवारी
आरसीबी विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. प्रमुख फलंदाज जोस बटलर ८, मनन वोहरा ७ व डेव्हिड मिलर पहिल्या सहा षटकात बाद झाले. याचबरोबर राजस्थानने एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला. २०१८ आयपीएलपासून पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक गडी गमावण्याच्या बाबतीत राजस्थान अव्वलस्थानी आला. संघाचे २०१८ पासून गुरुवारच्या सामन्यापर्यंत पॉवर प्लेमध्ये तब्बल ३९ गडी बाद झाले आहेत.
आयपीएलमध्ये २०१८ पॉवर प्लेमध्ये पासून सर्वाधिक गडी गमावण्याच्या बाबतीत दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीचे या काळात ३४ फलंदाज पॉवर प्लेमध्ये बाद झाले आहेत.
या हंगामातील पॉवर प्लेमधील कामगिरी
राजस्थानने या हंगामात चार सामने खेळताना पॉवर प्लेमध्ये १० गडी गमावले आहेत. यामध्ये दोन वेळा तीन-तीन फलंदाज एकाच सामन्यात बाद झाले. या चारही सामन्यात पॉवर प्लेमध्ये बाद होणार आहे मनन वोहरा एकमेव फलंदाज आहे. त्यानंतर, जोस बटलर व संजू सॅमसन प्रत्येकी दोन वेळा, तर बेन स्टोक्स शिवम दुबे प्रत्येकी एकदा पॉवर प्लेमध्ये बाद झाले आहेत.
राजस्थानची कचखाऊ फलंदाजी
आरसीबी विरुद्धच्या या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी अत्यंत खराब फलंदाजी केली. राजस्थानने आपले पहिले ४ फलंदाज ४३ धावांमध्ये गमावले. त्यानंतर दोन अष्टपैलू शिवम दुबे व रियान परागने ६७ धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने संघासाठी सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. राहुल तेवतियाने अखेरीस आक्रमकपणे ४० धावा करत संघाला १७७ पर्यंत मजल मारून दिली. आरसीबीसाठी मोहम्मद सिराज व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी तीन बळी आपल्या नावे केले.
त्यानंतर बेंगलोरकडून १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने ४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७२ धावा आणि देवदत्त पडीक्कलने ५२ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांसह १०१ धावा करत बेंगलोरला १६.३ षटकात १० विकेट्सने विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा ऐतिहासिक कारनामा! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा कोहली बनला जगातील पहिलाच क्रिकेटपटू
धोनीच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत आले महत्त्वाचे अपडेट, हॉस्पिटल प्रशासन म्हणते…
रेकॉर्ड अलर्ट! मुंबई इंडियन्स नंतर ‘अशी’ कामगिरी केवळ दुसरा संघ बनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर