भारत देशात सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या महामारीचा फटका क्रिडाक्षेत्रालाही बसला असून इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयानंतर घरी परतलेल्या राजस्थान रॉयल्सचा युवा शिलेदार चेतन सकारिया याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील कांजीभाई सकारिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
टीव्ही ९ गुजरातने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपुर्वी सकारियाचे वडील कांजीभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गुजरातमधील भावनगर येथे त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर रविवारी (०९ मे) त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
घरी न जाता कोरोनाग्रस्त वडिलांना गेला होता भेटायला
सकारिया हा गुजरात राज्यातील भावनगर शहरातील राहणारा आहे. आयपीएल स्थगित होण्याच्या आठवडाभर आधी त्याचे वडिल कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे भावनगर येथे पोहोचल्यानंतर घरी न जाता सकारिया थेट आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तो त्यांच्याजवळ बसून होता. त्याच्या वडिलांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्याची चिंता वाढली होती.
यावेळी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सकारिया म्हणाला होता की, “मी नशिबवान आहे की, मला काही दिवसांपुर्वीच राजस्थान रॉयल्स संघाकडून माझी पगार मिळाली आहे. पैसे मिळताच मी त्वरित ते घरी पाठवले होते. आता त्याच पैशांचा वापर माझ्या कुटुंबाला होत आहे. या कठीण काळात त्यांना याची नितांत गरज होती.”
“लोक म्हणत आहेत की आयपीएल रद्द करा. मी त्यांना सांगू इच्छितो की, माझ्या घरात मी एकटाच कमावता व्यक्ती आहे. त्यातही क्रिकेट हेच माझे कमाईचे एकमेव स्त्रोत आहे. मी आयपीएलद्वारे जेवढे पैसे कमावले आहेत, त्याद्वारेच मी माझ्या वडिलांंना चांगले उपचार देऊ शकत आहे. जर एक महिनाभरासाठीही आयपीएल झाले नसते, तर मला आणि माझ्या कुटुंबाला आता खूप संघर्ष करावा लागला असता. मी अतिशय गरीब कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांनी त्यांचे पूर्ण आयुष्य टेम्पोचालकाचे काम केले आहे. आयपीएलमुळे माध्या जिवनाला वेगळे वळण मिळाले आहे,” असे त्याने पुढे म्हटले होते.
वडिलांपुर्वी गमावले होते भावाला
परंतु अखेर सकारियाने त्याच्या जिवलग वडिलांना गमावले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकारियाने काही महिन्यांपुर्वीच त्याचा भाऊ राहुल सकारियाला गमावले होते. राहुलने आत्महत्या केली होती.
अवघ्या २० लाखांच्या मुळ किंमतीसह आयपीएल २०२१ लिलावात उतरलेल्या सकारियाला राजस्थान रॉयल्सने १.२० कोटींना विकत घेतले होते. या हंगामात ७ सामने खेळताना त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ३१ चेंडूवर ३ विकेट्सचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकारियावर कोसळला दुखाचा डोंगर, कोरोनामुळे वडिलांचे झाले निधन
मालदीवच्या बारमध्ये डेविड वॉर्नर आणि समालोचकामध्ये झाली हाणामारी! जाणून घ्या पूर्ण प्रकरण





