अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात शनिवारी (२ ऑक्टोबर) डबल हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अबुधाबीच्या शेख झायद स्टेडियमवर झाला. या सामन्यात राजस्थानने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे.
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८९ धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी १९० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग राजस्थानने १७.३ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला.
राजस्थानकडून १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि एविन लुईस यांची जोडी उतरली. या दोघांनी सुरुवातीपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यातही जयस्वालने तुफानी फलंदाजी केली. त्यामुळे पहिल्या ४ षटकांतच राजस्थानने धावफलकावर ५० धावा लावल्या. त्यानंतर ५ व्या षटकात जोश हेजलवूडच्या चेंडूवर षटकार ठोकत जयस्वालने १९ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
पण, ६ व्या षटकात लुईसला शार्दुल ठाकूरने २७ धावांवर बाद केलं. पाठोपाठ ७ व्या षटकात केएल असिफने जयस्वालला २० चेंडूत ५० धावांवर माघारी धाडले. पण, त्यानंतरही शिवम दुबेने कर्णधार संजू सॅमसनला साथीला घेत चेन्नईच्या गोलंदाजांवरील आक्रमण कायम ठेवले. या दोघांनी ११ षटकांत संघाची धावसंख्या १२५ धावांपर्यंत पोहचवली. १४ व्या षटकांत दुबेने त्याचे पहिले आयपीएल अर्धशतक पूर्ण केले.
पण, १६ व्या षटकात सॅमसनने २८ धावांवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. पण, त्यानंतर ग्लेन फिलिप्सने दुबेला साथ दिली आणि संघाला १८ व्या षटकांत विजयापर्यंत पोहचवले. दुबेने ४२ चेंडूत नाबाद ६४ धावा करताना ४ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच फिलिप्स ८ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला.
चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर केएल असिफने १ विकेट घेतली.
ऋतुराज गायकवाडचे शतक
या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने डावाची सुरुवात केली. या दोघांनी या सामन्यातही चेन्नईला चांगली सुरुवात दिली. पण ६ व्या षटकात डू प्लेसिस आणि गोलंदाज मुस्तफिजूरची जोरदार धडक झाली. त्यामुळे फिजिओला मैदानात यावे लागले. पण डू प्लेसिसने पुढे खेळणे सुरु ठेवले. पण तो ७ व्या षटकात २५ धावांवर राहुल तेवतियाच्या चेंडूवर यष्टीचीत झाला. त्यामुळे सलामीची ४७ धावांची भागीदारी तुटली.
त्यानंतर फलंदाजीला आलेला सुरेश रैना फार काळ टिकला नाही. त्याला तेवतियानेच ९ व्या षटकात ३ धावांवर शिवम दुबेकडे झेल देण्यास भाग पाडले. पण यानंतर मोईन अलीने ऋतुराजला चांगली साथ दिली. ऋतुराजने १४ व्या षटकात त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीची जोडी मैदानावर जमली असतानाच राहुल तेवतियानेच ५ व्या षटकात मोईनला २१ धावांवर बाद केले. त्यानंतर अंबाती रायुडू फार काही खास करु शकला नाही. त्याला चेतन साकारीयाने १७ व्या षटकात २ धावांवर बाद केले. पण नंतर जडेजाने ऋतुराजची चांगली साथ दिली.
जडेजाने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक खेळ करत चेन्नईला १८० धावांचा टप्पा पार करुन दिला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर ऋतुराजने षटकार खेचत त्याचे पहिले-वहिले आयपीएल शतक पूर्ण केले. यासह चेन्नईने २० षटकात ४ बाद १८९ धावा केल्या. ऋतुराज ६० चेंडूत १०१ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. तसेच जडेजा ४ चौकार आणि १ षटकारासह ३२ धावांवर नाबाद राहिला.
राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर चेतन साकारियाने १ विकेट घेतली.
असे आहेत ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ, जोश हेजलवुड
राजस्थान रॉयल्स: एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, आकाश सिंग, मयंक मार्कंडे, चेतन साकरिया, मुस्तफिजूर रहमान