दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात ३ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. तर, यजमान दक्षिण आफ्रिका संघाने दिवसाखेर एक बाद ३५ धावा बनविल्या आहेत.
या सामन्यात प्रभारी कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी पहिला तासभर चांगले फटके खेळत संघाला दमदार सुरूवात करून दिली. परंतु १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मयंकच्या रूपात संघाला पहिला धक्का बसला. ५ चौकारांच्या मदतीने २६ धावा करणारा मयंक मार्को जानसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कायल व्हेरिकेनच्या हाती झेल देत बाद झाला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला होता. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे तो जास्त वेळ तग धरू शकला नाही. परिणामी २४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डुआन ऑलिव्हियरने त्याला झेलबाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अशाप्रकारे भारताला लागोपाठ २ धक्के बसले. यासह भारत ३ बाद ४९ धावा अशा स्थितीत आहे.
भारताचा निम्मा संघ तंबूत
दुसऱ्या सत्राची सुरुवात राहुल व विहारी यांनी ३ बाद ५३ पासून केली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चौथी यश मिळवून देण्यासाठी चांगलेच झगडवले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. रबाडाच्या चेंडूवर डसेनने शॉर्ट लेगवर अफलातून झेल घेऊन विहारीची खेळी संपविली. त्याने २० धावा केल्या. त्यानंतर, राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याला याच धावसंख्येवर जेन्सनने बाद केले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ५ बाद १२३ धावा झाल्या होत्या. तर खेळपट्टीवर रिषभ पंत व रविचंद्रन अश्विन उभे होते.
भारत 202 धावांवर सर्वबाद
तिसऱ्या सत्राची सुरुवात भारतीय संघासाठी निराशाजनक झाली. भारताचा अखेरचा स्पेशालिस्ट फलंदाज रिषभ पंत मार्को जेन्सन याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाच्या हाती झेल देऊन परतला. त्याने १७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूर याला खाते खोलता आले नाही. त्यापाठोपाठ मोहम्मद शमी हा देखील माघारी परतला. संघाचा प्रमुख अष्टपैलू व फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत संघाची धावसंख्या पुढे नेली. वैयक्तिक ४६ धावा काढून तो बाद झाला. जसप्रीत बुमराहने काही मोठे फटके खेळात भारताला २०० धावांच्या पलीकडे नेले. मोहम्मद सिराज भारताचा बाद होणारा भारताचा अखेरचा फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेसाठी ऑलिव्हियरने व रबाडाने प्रत्येकी तीन तर मार्को जेन्सनने चार बळी आपल्या नावे केले.
दक्षिण आफ्रिकेची सावध सुरवात
भारतीय संघाला २०२ धावांवर सर्वबाद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला दिवसातील उर्वरित १८ षटके खेळून काढायची होती. कर्णधार डीन एल्गर व एडेन मार्करम या जोडीने दक्षिण आफ्रिकेसाठी सुरुवात केली. मार्करम ७ धावा काढून शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, युवा किगन पीटरसन व एल्गर यांनी जोखीम न घेता संघाला दिवसाखेर ३५ धावांपर्यंत मजल मारून दिली. अद्याप दक्षिण आफ्रिका १६७ धावांनी मागे आहे.
नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी १ वाजता या सामन्यासाठी नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली हा कंबरेच्या दुखापतीमुळे या सामन्यास अनुपलब्ध असेल. त्याच्याजागी हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे. तर केएल राहुलच्या हाती नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत. तसेच यजमान दक्षिण आफ्रिका संघातही २ बदल करण्यात आले आहेत. क्विंटन डी कॉकच्या जागी काइल व्हेरीन आणि वियान मल्डरच्या जागी डुआन ओलिव्हियरला जागा दिली गेली आहे.






