सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर होत असलेला हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा नवनियुक्त उपकर्णधार केएल राहुलने शानदार शतक झळकावले. हेेेे शतक पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले.
मयंक-राहुलची दमदार सलामी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी योग्य ठरवला आहे. भारताकडून केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे दोघजण सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले. या दोघांनीही नव्या चेंडूचे आव्हान चांगल्याप्रकारे पेलताना दक्षिण आफ्रिकेला यश मिळू दिले नाही. दोघांनी संघाला ११७ धावांची भागीदारी करून दिली. मयंक अर्धशतक करुन बाद झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने राहुलची साथ देत संघाला २०० च्या जवळ नेले. मात्र, लुंगी एन्गिडीच्या एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला अटक होण्याच्या नादात तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मल्डरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्याने ९४ चेंडूवर ३५ धावा केल्या. यासह त्याचा शतकाचा दुष्काळ आणखी काही दिवस लांबला.
राहुलचे अप्रतिम शतक
रोहित शर्माच्या अनुपस्थित भारतीय संघाचा प्रमुख सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या केएल राहुलने २१८ चेंडूंमध्ये शतक झळकावले. ते त्याच्या कारकिर्दीतील सातवे कसोटी शतक ठरले.
राहुल-रहाणेची अभेद्य भागीदारी
विराट बाद झाल्यानंतर संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे राहुलची साथ देण्यासाठी मैदानात उतरला. त्याने आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत दिवसाखेर भारताला ३ बाद २७२ धावांपर्यत मजल मारून दिली. राहुल १२२ तर रहाणे ४० धावा काढून नाबाद झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडीने सर्व तीन बळी मिळविले.