सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात रविवारपासून (२६ डिसेंबर) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्याचा मंगळवारी तिसरा दिवसाचा खेळ संपला. भारतीय संघा तिसऱ्या दिवसाअखेर १४६ धावांची आघाडी आहे.
भारताचा डाव ३२७ धावांवर संपुष्टात
या सामन्यातील दुसऱ्या दिवस पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाखेर जिथे खेळ थांबला तिथून पुढील खेळाला सुरुवात झाली. त्यामुळे पहिल्या दिवसाखेर भारताची नाबाद असलेली फलंदाजांची जोडी अजिंक्य रहाणे आणि केएल राहुल मैदानात उतरले. रहाणेने ४० धावांपासून आणि राहुलने १२२ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यांनी ९१ षटकांपासून आणि ३ बाद २७२ धावांपासून भारताचा पहिला डाव पुढे नेण्यास तिसऱ्या दिवशी सुरुवात केली.
मात्र भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. शतकवीर केएल राहुल दिवसाच्या चौथ्या आणि डावातील ९४ व्या षटकात बाद झाला. त्याने २६० चेंडूत १२३ धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला. त्याला कागिसो रबाडाने यष्टीरक्षक क्विंटॉन डी कॉकच्या हातून झेलबाद केले. तो बाद झाल्याने रिषभ पंत ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
मात्र, पंत आणि रहाणेची जोडीही फार काळ टिकू शकली नाही. रहाणेला ९७ व्या षटकात लुंगी एन्गिडीने ४८ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ आर अश्विनला कागिसो रबाडाने ४ धावांवर ९८ व्या षटकात बाद केले, तर ९९ व्या षटकात ८ धावांवर रिषभ पंतला लुंगी एन्गिडीने बाद करत भारताला ७ वा धक्का दिला.
त्यापाठोपाठ १०० व्या षटकात शार्दुल ठाकूर ४ धावांवर रबाडाच्या चेंडूवर बाद झाला. पुढच्याच षटकात मोहम्मद शमीला लुंगी एन्गिडीने ८ धावांवर बाद केले. अखेरच्या विकेटसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने झुंज दिली. पण अखेर १०६ व्या षटकात जसप्रीत बुमराहला १४ धावांवर मार्को जेन्सनने बाद करत भारताचा डाव १०५.३ षटकात ३२७ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद सिराज ४ धावांवर नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडाने ३ विकेट्स घेतल्या आणि मार्को जेन्सनने १ विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात
भारताचा डाव गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याला पहिल्या षटका तर एका धावेवर बाद केले. लंचसाठी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला असताना दक्षिण आफ्रिकेने २१ धावांवर एक बळी गमावला आहे. सध्या मैदानावर मार्करम व पीटरसन अनुक्रमे ९ व ११ धावा काढून मैदानावर आहेत.
दुसऱ्या सत्रावर भारताचे वर्चस्व
लंचनंतर खेळाला सुरुवात झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ धक्के दिले. मोहम्मद शमी याने नाबाद फलंदाज मार्करम व पीटरसन यांना तंबूत धाडले. तर, मोहम्मद सिराज याने वॅन डर डसेनला केवळ तीन धावा करून दिल्या.३२ धावांवर चौथा गडी बाद झाल्यानंतर अनुभवी क्विंटन डी कॉक व टेंबा बवुमा यांनी किल्ला लढविला. चहापानासाठी अवघी काही षटके शिल्लक असताना अष्टपैलू शार्दूल ठाकूरने डी कॉकला बाद केले. त्याने ३४ धावा केल्या. चहापानाला खेळ थांबला असताना बवुमा ३१ तर मल्डर ४ धावांवर नाबाद आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या ५ बाद १०९ धावा झाल्या आहेत.
भारताकडे पहिल्या डावात आघाडी
चहापानानंतर खेळाला सुरुवात झाल्यावर बवुमाने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ५२ धावा करून बाद झाला. त्यानंतर, मार्को जेन्सन व कगिसो रबाडा यांनी थोडाफार प्रतिकार केला. त्यांनी आठव्या गड्यासाठी ४७ धावा जोडल्या. त्यानंतर जेन्सनला शार्दुल तर रबाडाला शमीने बाद केले. रबाडाला बाद करतात शमीने कसोटी क्रिकेटमधील आपला २०० वा बळी मिळविला. अखेरीस बुमराहने केशव महाराजला बाद करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांवर गुंडाळला. भारतासाठी शमीने सर्वाधिक ५ बळी आपल्या नावे केले. भारताकडे पहिल्या डावात १३० धावांची आघाडी आहे.
दुसऱ्या डावात भारत १ बाद १६
यजमान संघाला १९७ धावांवरून गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावात केएल राहुल व मयंक अगरवाल यांनी डावाची सुरुवात केली. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीची उर्वरित ६ षटके खेळून काढायची होती. मात्र, मयंक ४ धावा काढून बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या नाईट वॉचमन शार्दुल ठाकूर याने उर्वरित पाच चेंडू खेळून काढत भारताला १६ धावांपर्यंत मजल मारून दिली. राहुल ५ तर शार्दुल ४ धावाकडून नाबाद आहे.