जुलै महिना सुरू होताच टेनिस प्रेमींना विम्बल्डनचे (Wimbledon) वेध लागतात. चार ग्रँडस्लॅम पैकी आपल्या वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेली ही एक स्पर्धा. खेळाडूंच्या पोषाखापासून ते पंच,प्रेक्षक या सर्वांसाठी नियमावली आखून देण्यात आलेली आहे. परंतु खेळाडू आणि खेळ या पलीकडे अजून एक गोष्ट आहे ज्यासाठी विम्बल्डन ओळखली जाते ती म्हणजे रूफस (Rufus) नावाचा ससाणा.
आज आपण याच रूफस (Rufus) विषयी जाणून घेऊया.
हॅरिस प्रजातीचा हा ससाणा 2003 पासून विम्बल्डनच्या वेळी मैदानावर येणार्या इतर पक्षांना हाकलण्याचे काम करतो. रूफस हा विम्बल्डनचा अधिकृत बर्ड स्केरर ( Bird Scarer) आहे. २००० पर्यंत विम्बल्डन च्या वेळी कबुतरांना मुळे अनेकदा सामन्यात व्यत्यय येत असत त्यावेळी ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटना व क्रॉकेट क्लब यांनी अशा प्रकारचा एक ससाणा खास त्या कबुतरांना घाबरवण्यासाठी कामावर ठेवला. २००० ते २००३ पर्यंत हमीश नावाच्या ससाण्याने ही जबाबदारी पार पाडली. त्यानंतर ची जबाबदारी रूफसच्या खांद्यावर आली.
ऑल इंग्लंड क्लबच्या मालकीच्या ४२ एकर जमिनीवर तो वर्षभर नजर ठेवण्याचे काम करतो. यामध्ये वेस्टमिन्स्टर अबे, रुग्णालये, एअर फिल्ड आणि क्लबच्या मालकीच्या जमिनीवर पक्षी येऊ न देण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. रूफसने विम्बल्डन सोबतच २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी आपली सेवा दिली आहे. पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत तो आपले काम इमानदारीने करत असतो.
२८ जून २०१२ रोजी रूफस त्याच्या मालकाच्या गाडीमधून हरवला होता तीन दिवसानंतर त्याचा शोध लागला. परंतु त्या तीन दिवसात बराच ‘जागतिक आक्रोश’ झाला. त्यामुळे रुफसला “जगातील सर्वात उल्लेखनीय पक्षी’ तसेच ‘ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पक्षी’ मानले गेले.
रूफस, स्टेला आर्टोइस (Stella Artois) यांच्या जाहिरात मालिका “Here’s To Perfection” मध्ये सुद्धा दिसला आहे. रूफसवर अनेक माहितीपट तयार केलेले आहेत.
रुफसकडे स्वतःचे विम्बल्डनचे सिक्युरिटी फोटोकार्ड सुद्धा आहे ज्यावर “बर्ड स्केरर” हा जॉब टायटल अधोरेखित केला आहे. रूफसची ट्विटर आणि फेसबुक वर सुद्धा खाती आहेत. ट्विटरला Rufus The Hawk या नावाने त्याचे खाते असून १०४५१ फॉलोवर्स त्याला आहेत तसेच ४३०० ट्विट त्याच्या खात्यावरुन झाले आहेत.