बांगलादेशने घरच्या मैदानावर भारताला वनडे मालिकेत 2-1ने पराभूत केले, मात्र दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये 2-0 असे पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. डोमिंगो 2019च्या सप्टेंबर महिन्यापासून संघासोबत होते. त्यांच्या आधी स्टीव रोड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या कार्यकाळात संघाने अनेक बलाढ्य संघांना पराभूत केले.
रसेल डोमिंगो (Russell Domingo) हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांच्या बांगलादेशच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ 2023च्या विश्वचषकापर्यंत होता. त्यांनी भारताविरुद्धच्या मालिकेला दोन दिवस होताच राजीनामा दिला. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे परिचालन अध्यक्ष जलाल युनूस म्हणाले, “डोमिंगो यांनी कालच (मंगळवारी 27 डिसेंबर) राजीनामा दिला आहे, तो त्वरित स्विकारला गेला.”
“आम्हाला अशा प्रशिक्षकांची आवश्यकता आहे ज्यांच्या खेळाडूंवर चांगला परिणाम होईल. तुम्हाला येत्या काळाच बांगलादेशच्या संघात अनेक बदल दिसतील. आम्ही याच मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. भारतालाही पराभूत करण्याच्या जवळ होतो, मात्र तो एक मजबूत संघ होता,” असे युनूस क्रिकबजशी बोलताना पुढे म्हणाले आहेत.
डोमिंगो यांच्या कार्यकाळात बांगलादेश घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिका जिंकले. त्याचबरोबर संघाने न्यूझीलंडमध्ये कसोटी जिंकण्याचीही ऐतिहासिक कामगिरी डोमिंगो यांच्या कार्यकाळातच केली. तसेच दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका आणि घरच्या मैदानावर भारताविरुद्धची वनडे मालिका जिंकली.
बांगलादेशने भारताविरुद्धची पहिली कसोटी 188 धावांनी गमावली होती. दुसऱ्या कसोटीतही त्यांनी चांगला प्रयत्न केला आणि भारताला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताला गाठण्यात कठीण जात होते, कारण बांगलादेशी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी होती. अखेर आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या उल्लेखनीय भागीदारीमुळे भारताला तो विजय मिळवता आला. नाहीतर संघ जवळपास सामना गमावणारच होता.
त्या सामन्यात अश्विन-अय्यर जोडीने आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप
मेस्सीने धोनीच्या मुलीला पाठवली खास भेट, झिवाने इंस्टाग्रामवर केला खुलासा