अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने जिंकला. पण या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. याबरोबरच त्याने अनेक विक्रमही केले.
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केली. डू प्लेसिस बाद झाल्यानंतरही ऋतुराजने त्याची शानदार फलंदाजी कायम ठेवली. त्याने डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. त्याने ६० चेंडूत १०१ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.
चेन्नईकडून शतक करणारे क्रिकेटर
ऋतुराज आयपीएलमध्ये शतक करणारा चेन्नई सुपर किंग्सचा ७ वा खेळाडू आहे. यापूर्वी मुरली विजय, शेन वॉटसन, मायकल हसी, सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्यूलम आणि अंबाती रायडू या खेळाडूंनी आयपीएलमध्ये सीएसकेकडून शतक केले आहे.
आयपीएलमध्ये सीएसकेकडून शतक करणारा युवा फलंदाज
ऋतुराजने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून कमी वयात शतक झळकावण्याची किमया साधली आहे. त्याने वयाच्या अवघ्या २४ वर्षे २४४ दिवस झाले असतांना आयपीएलमध्ये शतक लगावले आहे. याआधी हा विक्रम मुरली विजय याच्या नावे होता. त्याने वयाच्या २६ वर्षे आणि २ दिवस झाले असताना हा विक्रम आयपीएलमध्ये नोंदवला होता. तिसऱ्या स्थानावर सुरेश रैना आहे. त्याने त्याच्या वयाच्या २६ वर्षे आणि १५६ दिवस झाले असताना शतकी खेळी केली होती.
राजस्थानविरुद्ध सातवे शतक
ऋतुराजने केलेले शतक हे आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्ध केलेले सातवे शतक आहे. यापूर्वी राजस्थानविरुद्ध मयंक अगरवाल, मुरली विजय, शेन वॉटसन, देवदत्त पडीक्कल, शॉन मार्श आणि अँड्र्यू सायमंड्स यांनी शतकं केली आहेत.
राजस्थानविरुद्ध शतक करणारा सीएसकेचा तिसरा फलंदाज
राजस्थानविरुद्ध शतक करणारा ऋतुराज चेन्नई सुपर किंग्सचा तिसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी मुरली विजयने २०१० साली १२७ धावा आणि शेन वॉटसनने २०१८ साली १०६ धावांची खेळी राजस्थान विरुद्ध केली होती.
चेन्नईचा पराभव
या सामन्यात ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने २० षटकात ४ बाद १८९ धावा केल्या आणि राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले. १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी तुफानी फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. त्यांना एविन लुईस (२७), संजू सॅमसन (२८) आणि ग्लेन फिलिप्सने (१४*) चांगली साथ दिली. जयस्वालने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. तर, दुबे ४२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे १७.३ षटकात राजस्थानने धावांचा पाठलाग पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऋतुराजचा नाद खुळा, आयपीएलमध्ये अशा पद्धतीने शतक पूर्ण करणारा ठरला एकमेव खेळाडू
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या आणले नाकी नऊ, उभारली आपली सर्वोच्च धावसंख्या
‘हिटमॅन’ची ताकदच बनतेय चिंतेचा विषय, आवेश खानने असे पकडले रोहितला जाळ्यात, पाहा व्हिडिओ