आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे. ऋतुराजनं लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 56 चेंडूत शतक ठोकलं. आपल्या या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 3 षटकार लगावले.
ऋतुराजनं 18व्या षटकात यश ठाकूरच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केलं. यापूर्वी आयपीएलच्या या हंगामात ऋतुराजची सर्वाधिक धावसंख्या 67 होती. त्यानं केकेआरविरुद्धच्या सामन्यात नाबाद 67 धावा करत चेन्नईच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.
ऋतुराज गायकवाडच्या आयपीएल कारकिर्दीतील हे सर्वात जलद शतक ठरलं आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध 60 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. आता लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं 56 चेंडू खेळून शतक पूर्ण केलं आहे. सीएसकेसाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम मुरली विजयच्या नावावर आहे. त्यानं 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध अवघ्या 46 चेंडूत शतक ठोकलं होतं.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सीएसके नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आली. एका टोकाकडून सातत्यानं विकेट पडत होत्या, मात्र ऋतुराजनं एक टोक सांभाळून ठेवत शानदार शतक झळकावलं. या डावात शिवम दुबंनेही त्याला चांगली साथ दिली. या दोघांमध्ये 104 धावांची भागीदारी झाली. दुबे अवघ्या 27 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. त्यानं 3 चौकार आणि 7 षटकार ठोकले.
ऋतुराज गायकवाड आयपीएल 2024 मध्ये शतक ठोकणारा 7वा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, ट्रॅव्हिस हेड आणि सुनील नारायण यांनी शतकं झळकावली आहेत. ऋतुराज गायकवाडनं आयपीएलच्या या हंगामात खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 3 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. चालू मोसमात त्याच्या बॅटमधून 58.16 च्या सरासरीनं 349 धावा निघाल्या आहेत. यासह आता तो ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –