“गेल्या 2-3 वर्षांत रोहितनंही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही”, सतत टीकेचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याला वीरेंद्र सेहवागची साथ

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून त्याच्यावर सातत्यानं टीका होत आहे. माजी कर्णधार रोहित शर्माचे चाहते त्याला मैदानावर फार ट्रोल करत आहेत.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरीही यंदाच्या मोसमात निराशाजनकच राहिली. संघाला आतापर्यंत 8 पैकी केवळ 3 सामन्यांत विजय मिळाला आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ पुढे आला आहे.
‘क्रिकबझ’शी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “मला वाटत नाही की हार्दिकवर दबाव आहे. किंबहुना त्याच्यावर स्वतःच्या अपेक्षांचं ओझं असेल. कारण मुंबई इंडियन्सची गेल्या हंगामात आणि त्याआधीच्या काही हंगामातही अशीच परिस्थिती होती. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून धावा केल्या नव्हत्या. शिवाय रोहितला गेल्या दोन-तीन वर्षांत संघासाठी ट्रॉफी जिंकता आली नाही.”
सेहवाग पुढे म्हणाला, “मुंबई इंडियन्सला माहित आहे की ते याआधीही अशा परिस्थितीत राहिले आहेत. जर संघ त्याच्याकडून जास्तीची अपेक्षा करत असेल की तो विकेट घेत नाही, धावा काढत नाही आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीम हरत आहे, तरं हे चुकीचं आहे.”
मुंबई इंडियन्सच्या जवळपास प्रत्येक सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शेवटच्या सामन्यात संघाला राजस्थान रॉयल्सकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्यासाठी चिंतेची बाब म्हणजे, आयपीएलच्या या हंगामात तो स्वत: खेळाडू म्हणून अपयशी ठरतो आहे. या हंगामात आतापर्यंत त्याची बॅट आणि बॉलनं कामगिरी फारच निराशाजनक राहिली. तो चेंडूनं विकेट घेण्यात अपयशी ठरत असून बॅटनंही त्याला एकही मोठी खेळी खेळता आलेली नाही.
आयपीएलच्या या हंगामात हार्दिक पांड्याच्या बॅटमधून 8 सामन्यांमध्ये 151 धावा निघाल्या आहेत. त्याची सरासरी 21.57 एवढी असून 33 चेंडूत 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्यानं 10.94 च्या इकॉनॉमी रेटनं 4 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI च्या अधिकाऱ्यांचा पगार किती असतो? वर्षाची कमाई किती? आकडेवारी जाणून बसेल धक्का!
टी20 विश्वचषकासाठी रोहित ब्रिगेड सज्ज! प्रोमो रिलीज; देशभक्तीपर गाणं ऐकून तुम्हीही हरवून जाल!