विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड धावांचा पाऊस पाडत आहे. महाराष्ट्राच्या या कर्णधारानं आता सर्व्हिसेसविरुद्ध नाबाद 148 धावा केल्या. गायकवाडच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्रानं 50 षटकांच्या सामन्यात 21व्या षटकातच 205 धावांचं लक्ष्य गाठले. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील ऋतुराजचं हे 13वं शतक आहे.
या सामन्यात सर्व्हिसेसनं प्रथम फलंदाजी करताना 204 धावा केल्या होत्या. सर्व्हिसेससाठी कर्णधार मोहित अहलावत हा 50 धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज होता. त्यानं 61 धावांची खेळी खेळली. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राला ऋतुराज गायकवाड आणि ओम भोसले यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांमध्ये 86 धावांची सलामी भागीदारी झाली. भोसले 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर सिद्धेश वीरनं कर्णधाराला शेवटपर्यंत साथ दिली.
गायकवाड आज वेगळ्याच लयीत दिसत होता. त्यानं अवघ्या 74 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटनं 148 धावा केल्या. ऋतुराजनं 57 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं आपल्या खेळीत 16 चौकार आणि 11 षटकार मारले. आता महाराष्ट्राचा संघ 2 सामन्यांत दोन विजय मिळवून ब गटात अव्वल स्थानावर आहे. याआधी संघानं राजस्थानचा 3 गडी राखून पराभव केला होता.
ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम करण्यापासून फक्त 2 पाऊलं दूर आहे. आतापर्यंत त्यानं या स्पर्धेच्या इतिहासात 13 शतके झळकावली. या यादीत फक्त अंकित बावणे त्याच्या पुढे आहे, ज्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 14 शतकं झळकावली होती. ऋतुराज सध्याच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी शतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे.
हेही वाचा –
इशान किशनने ठोकले शानदार शतक! किशनसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडणार?
मोठी बातमी! विनोद कांबळीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
सुनील गावस्करांचा टीम मॅनेजमेंटवर राग, अश्विनसोबत झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला!