चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार खेळी खेळली. त्याचं या हंगामातील दुसरं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. गायकवाड 54 चेंडूत 98 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. ऋतुराज गायकवाड भलेही त्याचं शतक पूर्ण करू शकला नाही, मात्र चेन्नईच्या स्लो विकेटवर त्यानं आपल्या खेळीनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं. सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड 20 व्या षटकात बाद झाला. टी नटराजनच्या चेंडूवर नितीश रेड्डीनं त्याचा झेल टिपला. या शानदार खेळीनंतर ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 63.86 च्या सरासरीनं 447 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 149.50 एवढा आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीनं 10 सामन्यांत 71.43 च्या सरासरीनं 500 धावा केल्या आहेत. परंतु आता विराट कोहलीला ऋतुराज गायकवाडकडून कडवी टक्कर दिली जात आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे, ज्यानं 10 सामन्यांमध्ये 418 धावा केल्या आहेत.
ऋतुराज गायकवाडच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 3 गडी गमावून 212 धावा केल्या. गायकवाड व्यतिरिक्त शिवम दुबेनं 20 चेंडूत 39 धावांची शानदार खेळी केली. शिवम दुबेने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 4 षटकार लगावले. याशिवाय महेंद्रसिंह धोनी 2 चेंडूत 5 धावा करून नाबाद परतला.
सलामीवीर अजिंक्य रहाणे 12 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांच्यात चांगली भागीदारी झाली. मिशेलनं 32 चेंडूत 52 धावांचं योगदान दिलं. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल 14 वर्षांनंतर आरसीबीनं केला ‘हा’ भीम पराक्रम! गुजरातविरुद्ध एकापाठोपाठ एक मोडले अनेक रेकॉर्ड
6,6,6,6,6… वादळाचं दुसरं नाव म्हणजे ‘विल जॅक्स’! गुजरातविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत ठोकलं शतक