देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा हंगाम सध्या भारतातील काही शहरांमध्ये सुरू आहे. या स्पर्धेच्या पाचव्या फेरीचा सामन्यांमध्ये महाराष्ट्र आणि विदर्भ हे संघ आमने-सामने आले. यामध्ये महाराष्ट्र संघाने आठ गडी राखून मोठा विजय मिळवला. अनुभवी ऋतुराज गायकवाड याने नाबाद शतक झळकावत महाराष्ट्राच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात विदर्भ संघाला प्रथम फलंदाजीचा मान मिळाला. विदर्भ संघासाठी ध्रुव शोरे व कर्णधार अथर्व तायडे यांनी 64 धावांची वेगवान सलामी दिली. ध्रुव याने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र इतर फलंदाजांना 25 चा आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे त्यांचा डाव 177 पर्यंत मर्यादित राहिला महाराष्ट्र संघासाठी अनुभवी सत्यजित बच्छाव याने सर्वाधिक 4 बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्रासाठी ऋतुराज गायकवाड व कर्णधार केदार जाधव ही अनुभवी जोडी मैदानात उतरली.मैदानात उतरली. केदारने सुरुवातीपासून आक्रमण करत विदर्भ संघावर दबाव टाकला. त्याने केवळ 17 चेंडूंमध्ये 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा काढल्या. त्यानंतर अजीम काझी पहिल्याच चेंडूवर खातेही न खोलता बाद झाला. मात्र, ऋतुराजने त्याला सिद्धार्थ म्हात्रे यांनी चांगली साथ दिली. ऋतुराज अखेरपर्यंत नाबाद राहत केवळ 51 चेंडूंमध्ये 11 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या. तर सिद्धार्थने 32 धावांचे योगदान देत संघाला विजयी बनवले.
महाराष्ट्र संघाचा हा स्पर्धेतील दुसरा विजय असून, त्यांना दोन पराभव देखील पाहावे लागले आहेत. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यात विजय मिळवावा लागेल.
(Ruturaj Gaikwad Hits Century Against Vidharbha In Syed Mushtaq Ali Trophy 2023)