भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) खेळला जाणार होता. परंतु कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला. हा सामना आज (२८ जुलै) खेळला जाणार आहे.
तसेच संघातील मुख्य खेळाडू आयसोलेशनमध्ये असल्यामुळे संघातील युवा खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये सर्वात पुढे नाव आहे ते, इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे. ऋतुराजने आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. (Ruturaj Gaikwad may debut for india against srilanka in 2nd T20I with Shikhar Dhawan)
मंगळवारी (२७ जुलै) भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंऐवजी ऋतुराज गायकवाड टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसून येऊ शकतो.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने १२ सामन्यात ७५ च्या सरासरीने एकूण ३९६ धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे भारतीय संघातील खेळाडू पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आयसोलेशनमध्ये असलेल्या खेळाडूंना श्रीलंका संघाविरुद्ध होणारे उर्वरित २ टी -२० सामने खेळता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या आशांवर पाणी! ऑलिंपिक पदकाच्या शर्यतीतून भारतीय नौकानयन जोडी बाहेर
अती सुरक्षित बायोबबल असताना देखील कृणालला कशी काय झाली कोरोनाची लागण?
काय सांगता! दिग्गज गॅरी सोबर्स यांनी चक्क दारुच्या नशेत लॉर्ड्सवर झळकावले होते शतक, वाचा तो किस्सा