आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सलग चौथा पराभव झाला आहे. एका रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जकडून चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनीही या पराभवाचे कारण स्पष्ट केले. त्याने पराभवासाठी गोलंदाजी किंवा फलंदाजीला दोष दिला नाही तर खराब कामगिरीसाठी क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले. चेन्नई सुपर किंग्जच्या क्षेत्ररक्षकांनी एक-दोन नव्हे तर पाच संधी गमावल्या. याशिवाय, काही अतिरीक्त धावा देखील मैदानावर खर्च करण्यात आले. याचे परिणाम संघाला भोगावे लागले. कर्णधाराने म्हटला की, आम्ही फक्त खराब क्षेत्ररक्षणामुळे चार सामने गमावले आहेत.
सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात ऋतुराज गायकवाड म्हणाला, “माझ्या मते गेल्या चार सामन्यांमध्ये मुख्य फरक फक्त क्षेत्ररक्षणाचाच होता. आम्ही जे झेल सोडतोय, त्याच फलंदाजाकडून नंतर 15, 20, 30 धावा जास्त मिळतात. प्रियांशने छान खेळ केला. कधी कधी आपल्याला त्याचं कौतुकही करायला हवं. त्याने जोखीम घेतली, पण ती फलंदाजी यशस्वी ठरली. आम्हाला वेळोवेळी विकेट्स मिळत होत्या, पण त्याने रनगती कायम ठेवली. जर 10-15 धावा कमी झाल्या असत्या, तर आम्हाला नक्कीच मदत झाली असती, पण ते आमच्याकडून चुकलेल्या झेलांवर अवलंबून होतं.
तो पुढे म्हणाला, “फलंदाजीच्या दृष्टीने बघितलं तर आजचं (पंजाब विरूद्ध) प्रदर्शन अगदी छान होतं. आमचे दोन सर्वोत्तम फलंदाज रचिन आणि कॉनवे जे जलद आणि प्रभावी खेळतात, ते वरच्या क्रमात उतरले आणि त्यांनी पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. फलंदाजीत खूप सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. आम्ही फक्त दोन-तीन मोठ्या फटक्यांपासून दूर होतो. डेव्हॉनने चेंडू जास्त खेळला, पण वरच्या क्रमात तो खूप उपयोगी ठरतो. जडेजाची भूमिका थोडी वेगळी असते. मी आधीच सांगितलं होतं की, क्षेत्ररक्षणाचा आनंद घेतला पाहिजे. जर तुम्ही दबावात असाल किंवा भीतीने खेळत असाल, तर झेल सुटतील. पण जर तुम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करायचं असेल, तर दोन-तीन धावा वाचवणं, एखादा धावबाद हे सगळं संघासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. फलंदाजी आणि गोलंदाजीत काही दिवस चुकू शकतात, पण क्षेत्ररक्षणात ती चूक परवडत नाही.






