इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील चेन्नई सुपर किंग्जचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड पहिल्या तीन सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर त्याला कर्णधार एमएस धोनीकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी करण्यास सुरूवात केली. त्याने मागील सत्रातील शेवटच्या तीन सामन्यात सलग अर्धशतके झळकावली होती. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध नाबाद 65, कोलकाता नाइट रायडर्स विरूद्ध 72 आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध 62 धावांच्या खेळीचा समावेश होता.
धोनीने आपल्याला दिलेल्या सल्ल्याबद्दल ऋतुराज म्हणाला की, “तिसर्या सामन्यानंतर कर्णधार धोनीसोबत झालेल्या चर्चेत त्याने मला मुक्तपणे खेळण्याचा सल्ला दिला. धोनीने मला सांगितले की, क्रिकेटचा आनंद घे निकालाबद्दल विचार करू नको. फक्त वातावरणाचा आनंद घे आणि धैर्य ठेव. त्याला खात्री होती की, मी मैदानावर टिकलो तर नक्कीच काहीतरी घडवू शकतो.”
तो म्हणाला की, “मला वाटते हे माझ्यासाठी चांगले झाले कारण मी प्रक्रियेचा विचार न करता निकाल शोधत होतो. पण धोनीसोबत झालेल्या चर्चेने मला बरीच मदत मिळाली.”
येत्या 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२१ बद्दल विचारले असता मनावर कोणताही दबाव नाही, असे तो म्हणाला.
तसेच ऋतुराजने सांगितले की, “चेन्नई संघात आणि धोनीच्या क्रिकेटच्या दुनियेत प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. तेथील वातावरणच असे आहे की, मी आता निकालाऐवजी प्रक्रियेकडे जास्त लक्ष देत आहे. मला फक्त प्रक्रियेचा आनंद घ्यायचा आहे आणि मला खात्री आहे की मला मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये संघासाठी मी माझे योगदान देत राहीन.”
चेन्नई संघ आपल्या आयपीएल मोहीमेला 10 एप्रिल रोजी मुंबई येथे दिल्ली संघाच्या विरोधात प्रारंभ करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्समध्ये जोफ्रा आर्चरची जागा घेऊ शकणारे ३ गोलंदाज; कोण आहेत पाहा
आयपीएल २०२१ आधी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात सामील झाला दिग्गज खेळाडू; सांभाळणार ‘ही’ भूमीका
IPL 2021: चेन्नईसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला मुंबईत दाखल




