न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली. या संघातून गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj gaikwad) बाहेर काढण्यात आले आहे. संघात शुबमन गिलचे (Shubman gill) कर्णधार म्हणून पुनरागमन झाले असून, श्रेयस अय्यरची (Shreyas iyer) उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, श्रेयस अय्यरला फिटनेस टेस्ट पास केल्यानंतरच खेळता येईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ (Subramanyam badrinath on Ruturaj gaikwad) यांनी ऋतुराज गायकवाडच्या जागी नितीश कुमार रेड्डीची (Nitish Kumar Reddy) निवड केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, संघात आधीच रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे अनुभवी अष्टपैलू असताना नितीश कुमार रेड्डीला का निवडले, हे मला समजले नाही. ऋतुराजला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे, त्याला संघाबाहेर ठेवणे दुर्दैवी आहे.
संघात आधीच दोन अष्टपैलू आहेत, तरीही तिसरा म्हणून नितीश रेड्डी तिथे का आहे? ऋतुराज का नाही? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. बाकी संघ निवड योग्य असली, तरी ऋतुराजच्या जागी नितीशची निवड ही चिंतेची बाब आहे.
ऋतुराज गायकवाडने आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात 105 धावांची शानदार खेळी केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने उत्तराखंडविरुद्ध 124 धावांचे शतक ठोकले होते. इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये असूनही त्याला संधी नाकारण्यात आली आहे.
हार्दिक पांड्या (Hardik pandya) सध्या उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी पर्याय म्हणून नितीश रेड्डीला संधी देण्यात आल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले की, हार्दिक पांड्याला सध्या एका सामन्यात 10 षटके गोलंदाजी करण्याची परवानगी डॉक्टरांनी दिलेली नाही. आगामी टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता त्याच्या वर्कलोडवर लक्ष दिले जात आहे.






