---Advertisement---

नेहमीच विवादात राहिली श्रीसंतची कारकीर्द, स्पॉट फिक्सिंगव्यतिरिक्त झाले ‘हे’ मोठे वाद

On: गुरूवार, मार्च 10, 2022 4:18 PM
Sreesanth
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने वयाच्या ३९ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली. तो नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता आणि त्याने दोन विकेट्सही घेतल्या होत्या. दरम्यान, श्रीसंत भारतीय क्रिकेटमध्ये नेहीमी विवादात राहिलेला एक चेहरा आहे.

आयपीएलमध्ये हरभजन सिंगने मारलेली कानाखाली
आयपीएल स्पर्धा २००८ साली सुरू झाली आणि पहिल्याच हंगामात एस श्रीसंत (S Sreesanth) वादात सापडला. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील एका सामन्यात हा वाद झाला होता. अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग त्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता आणि श्रीसंत पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करत होता.

सामन्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी हातमिळवणी करताना हरभजन आणि श्रीसंत यांच्यात हा वाद झाला. त्यावेळी हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. हरभजनच्या म्हणण्यानुसार त्यावेळी श्रीसंतने दिलेली प्रतिक्रिया तो सहन करू शकला नाही आणि रागात त्याने कानाखाली मारली.

या वादानंतर हरभजन सिंग आयपीएल २००८ च्या संपूर्ण हंगामातून बाहेर केले गेले. त्यानंतर आयपीएलचे कमिश्नर सुधीर नानावटी यांच्या कमिटीने केलेल्या चौकशीनंतर हरभजनला पुढच्या ५ एकदिवसीय सामन्यांमधूनही बाहेर केले गेले. त्यानंतर मात्र त्याची बंदी उठवली गेली.

स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला होता श्रीसंत
एस श्रीसंतच्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंग हाच म्हणावा लागेल, जेव्हा तो आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला. आयपीएलच्या ६ व्या हंगामात त्याच्यावर स्पॉट फिक्सिंगचे गंभीर आरोप केले गेले होते आणि यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. यावेळी श्रीसंतसोबतच अजित चंडिला, अंकित चव्हाण हे खेळाडूही या प्रकरणात अडकले होते.

काही दिवस त्यांना पोलीस कोठडीत ठेवले गेले. त्यानंतर न्यायालयाने बीसीसीआयला या खेळाडूंवर घातलेल्या बंदीविषयी पुन्हा विचार करण्याच्या सुचना केल्या. पुढे मग बीसीसीआयने श्रीसंतवरच्या बंदीचा कालावधी कमी करून ७ वर्ष केला.

अनेकदा मिळाली होती सुचना
या दोन प्रमुख वादांव्यतिरिक्त अनेक वाद श्रीसंतच्या नावापुढे येतात. केरळ क्रिकेट असोसिएशननेही श्रीसंतला आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे एकदा सुचना दिली होती. त्यावेळी तो केरळ संघाच्या कॅम्पमध्ये उपस्थित राहिला नव्हता, जो कन्नूरमध्ये आयोजित केला गेला होता.  त्यानंतरही श्रीसंतला अनेक  सामन्यांमध्ये सामन्याचे रेफरी आणि पंच यांच्याकडून वेगवेगळ्या मुद्यांसाठी सुचना मिळाल्या होत्या.

दरम्यान, एस श्रीसंतवरची बंदी १३ डिसेंबर २०२० नंतर संपली आणि त्यानंतर तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न करत होता. त्याच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ७४ प्रथम श्रेणी, ९२ लीस्ट ए आणि ६२ टी-२० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Video: एकदम भन्नाट! पुजा वस्त्राकरच्या जबरदस्त डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंडची सुझी बेट्स रनआऊट

PHOTOS: राजस्थान रॉयल्सने नव्या रंगात नव्या ढंगात केली सरावाला सुरूवात

VIDEO: पत्नी आणि मुलीसह अजिंक्य रमला बालपणीच्या आठवणींत; दिली शाळेला सदिच्छा भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---