भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. तिथे संघ ३ कसोटी सामन्यांची मालिका आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच भारतीय संघ अजून एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकला नाही. कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आलं आहे. तसेच अजूनही एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर झालेला नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामधील गमतीची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेत गोलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनपेक्षा (Ravichandran Ashwin) जास्ती विकेट्स घेतल्या आहेत आणि विराट कोहलीने अश्विनएवढ्याच विकेट्स घेतल्या आहेत. ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. त्यामुळे रोहित आणि विराट गोलंदाज म्हणून सुद्धा संघाच्या विजयात योगदान देऊ शकतात.
कुलदीपने घेतल्या आहेत सर्वाधिक विकेट्स
दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आहे. त्याने ६ डावांत १४ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या आहेत. पण तो सध्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करून आला आहे आणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करतोय.
लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या यादीत १६ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तो एका डावांत पाच विकेट हॉल घेणारा एकमेव भारतीय आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे, त्यामुळे त्याला एकदिवसीय संघात समाविष्ट करू शकतात. जलद गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) ३ डावांत ९, तर जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) ६ डावांत ८ विकेट्स घेतल्या आहेत.
रोहित शर्माने २२ च्या सरासरीने ३ विकेट्स घेतल्या आहेत. ३० धावा देऊन २ विकेट्स हे त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. अश्विन, जडेजा, आणि विराट कोहली यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली आहे. जडेजासुद्धा दुखापतग्रस्त असल्याने कदाचित तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येऊ शकत नाही. अश्विन कसोटी संघासोबतच आहे आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी पण निवडला जाऊ शकतो. त्याने नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात चांगलंप्रदर्शन केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
- द. आफ्रिकेच्या ताफ्यात पसरलीय ‘या’ भारतीय खेळाडूची भीती, कर्णधारालाही आठवण आहे ३ वर्षांपूर्वीची जखम!
- पुजारा-रहाणेला जुन्या रंगात आणण्यासाठी महागुरूने घेतली धोनीच्या ‘शागीर्द’ची मदत, व्हिडिओ व्हायरल
- यशस्वी भव! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाला मिळाला ‘मास्टर क्लास’