मुंबई । कोरोना विषाणूमुळे केवळ खेळच नाही तर त्याशी संबंधित लोकही याचा परिणाम होत आहेत. जगात क्रिकेटचे पुनरागमन झाले असले तरी भारतात मात्र क्रिकेटची मैदाने सामसूम आहेत. दरम्यान ग्राऊन्ड स्टाफ मैदानावर येऊन रोज काम करत असतात. अशा परिस्थितीत केरळचा स्टार खेळाडू सचिन बेबी मदतीसाठी पुढे आला.
सचिन बेबी आपल्या पत्नीसह आपल्या राज्यात क्रिकेट मैदानावर काम करणार्या कर्मचार्यांना शिधा वाटप करीत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सचिनने सेंट पॉल कॉलेजच्या प्रत्येक ग्राउंड स्टाफला 20 किलो तांदूळ, दोन किलो साखर दिली. त्याच प्रकारे त्यांनी उर्वरित ग्राउंडवरील कर्मचार्यांना रेशनचे वितरणही केले. एवढेच नव्हे तर त्यांनी रेशन किटही तयार केली, जी उर्वरित ग्राउंड कर्मचार्यांना दिली जात आहे.
केरळचा कर्णधार सचिन बेबी म्हणाला, “क्रिकेट ही आमची रोजची भाकरी आहे. धावा करणं आणि विकेट घेणं यामागे या मैदानावरील कर्मचार्यांची मेहनत आहे. आम्ही त्यांना विसरू शकत नाही. माझ्या मते अन्न पैशापेक्षा महत्त्वाचे आहे. या कारणास्तव, मी मैदानावरील कर्मचार्यांना तांदूळ आणि साखर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला.”
सचिन म्हणाला, “मला आशा आहे की हे उर्वरित खेळाडूंसाठी प्रेरणा बनू शकेल आणि त्यांनीही पुढे येऊन त्यांना शक्य तितकी मदत केली पाहिजे.”