भारतीय संघाचा सर्वकालीन महान फलंदाज व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. काही विक्रम असेही आहेत, जे आजवर तोडले गेले नाहीत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यापासून तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अशातच क्रिकेटच्या मैदानावर विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावे सोशल मीडियावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
सचिन तेंडुलकरचा या वर्षीच्या ट्विटरवरील ५० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. ब्रँडवॉच या ग्राहक बुद्धिमत्ता कंपनीच्या वार्षिक संशोधनानुसार सचिन तेंडुलकर ३५ व्या क्रमांकावर आहे. त्याला ड्वेन जॉन्सन, लिओनार्डो दि कॅपारियोला व मिचेल ओबामांच्या आधी स्थान मिळाले आहे.
अमेरिकेची प्रसिद्ध गायक टेलर स्विफ्ट सर्वोच्च स्थानी आहे. तर भारताचे प्रधानमंत्री दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत सचिन तेंडुलकरला स्थान देण्याचे प्रमुख कारण म्हणजे, त्याने वंचित लोकांसाठी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. तसेच त्यांच्यासाठी योग्य मोहीम राबवून त्यांना योग्य मार्ग देखील दाखवला आहे.
सचिन तेंडुलकर राज्यसभेचा सदस्य देखील होता. एक दशकाहून अधिक काळ झाला आहे तो यूनिसेफसोबत जोडला गेला आहे. तसेच २०१३ मध्ये त्याची दक्षिण आशियाचा दूत म्हणन नियुक्ती करण्यात आली होती. सचिन तेंडुलकरने ग्रामीण आणि शहरी भारतातील आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे.
तसेच आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नव्हता. नामिबिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने म्हटले होते की, “मला एक गोष्ट लक्षात आली की, लेगस्पिनर अलिकडच्या काळात भारतीय संघाविरुद्ध खूप यशस्वी झाले आहेत. गुगली, टॉप स्पिन किंवा लेग स्पिन यांसारखे मिश्रण करून ते फलंदाजांना खूप त्रास देत आहे. मला वाटते की भारतीय फलंदाजांनी या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे.”






