2 एप्रिल 2011 हा दिवस जवळजवळ सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय ठरला. याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. हा विश्वचषक जिंकल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला भारतीय संघातील खेळाडूंनी खांद्यावर उचलून वानखेडे स्टेडियमवर फेरी मारली होती.
हा क्षण आपल्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या सचिनबरोबर चाहत्यांसाठीही गौरवशाली तसेच भावनिक होता. याच क्षणाला मागील ‘दोन दशकातील लॉरियस क्रिडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षण'(Laureus Sporting Moment Award 2000-2020) म्हणून निवडण्यात आले आहे. हा पुरस्कार सचिनने बार्लिन येथे झालेल्या लॉरियस क्रिडा पुरस्कार सोहळ्यात स्विकारला.
https://twitter.com/LaureusSport/status/1229486375059283970
या पुरस्कारासाठी 2011 च्या विश्वचषकात सचिनला खांद्यावर घेतलेल्या क्षणाला सर्वाधिक मते मिळाली. 2011 विश्वचषकातील या क्षणाला ‘कॅरिड ऑन द शोल्डर ऑफ अ नेशन’ असे नाव देण्यात आले होते.
2011 चा विश्वचषक सचिनच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक होता. त्याने त्याआधी 1992, 1996, 1999, 2003 आणि 2007 असे 5 विश्वचषक खेळले होते. पण या विश्वचषकांमध्ये भारतीय संघाला विजेतेपद जिंकण्यात अपयश आले होते. पण 2011 ला भारतीय संघाने विश्वचषक जिंकून सचिनला सर्वोत्तम भेट दिली होती आणि सचिनचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न पुर्ण केले होते.
https://twitter.com/ICC/status/1121156988065521664
2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारताला विजयासाठी 275 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गौतम गंभीर आणि एमएस धोनीच्या शानदार अर्धशतकी खेळींमुळे भारताला हे आव्हान सहज पेलता आले.
गंभीरने 97 धावांची खेळी केली होती आणि धोनीने नाबाद 91 धावा केल्या होत्या. तसेच धोनीने वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार मारत भारताचे विश्वविजेतेपद निश्चित केले होते.






