मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला अखेरचा एकदिवसीय सामना पाकिस्तान विरुद्ध आशिया चषक २०१२ दरम्यान खेळाला होता. त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला तो सामना जिंकणे अनिवार्य होते. त्या सामन्याआधी, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. याच बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने आपले १०० वे आंतरराष्ट्रीय शतक नोंदवले होते. परंतु, शाकीब अल हसनच्या धमाकेदार खेळीमुळे सचिनचे हे विश्वविक्रमी शतक व्यर्थ गेले.
त्यानंतर मात्र, भारताने पाकिस्तानविरुद्धचा ‘ करा किंवा मरा’ या स्थितीतील सामना सहा गडी राखून जिंकला. परंतु, हेड-टू-हेड निकषावर भारत त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र करू शकला नाही. त्या सामन्यानंतर मास्टर ब्लास्टरने ५० षटकांच्या प्रारूपात न खेळण्याचा निर्णय घेत डिसेंबर २०१२ मध्ये निवृत्तीची घोषणा केली.
या घटनेला आता ८ वर्षे उलटून गेले आहेत. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्यासोबत खेळणाऱ्या भारतीय संघातील केवळ तीनच खेळाडू आता सक्रिय आहेत. अन्य सर्व क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. यात युसुफ पठाणचे नाव निवृत्ती घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये नव्याने जोडले गेले आहे.
युसुफने शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या लेखातून आपण सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्यासोबत खेळणारे भारतीय खेळाडू सध्या काय करतात याविषयी आज आपण जाणून घेऊयात.
सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताची अंतिम इलेव्हन
1) गौतम गंभीर (Gautam Gambhir)
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात शतक केले मात्र त्यानंतर, बांगलादेश व पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला अनुक्रमे ११ आणि ० धावा जोडत आल्या.
साल २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचा हिरो असलेल्या गंभीरला त्यानंतर जास्त सातत्य दाखवता आले नाही. परिणामी, २०१३ मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले. पुढे, घरेलू क्रिकेटमध्ये धावा केल्याने, कसोटी संघात त्याने पुनरागमन केले. त्याने २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्ध अंतिम कसोटी सामना खेळला होता. तोच त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
साल २०१८ मध्ये गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि राजकारणात प्रवेश केला. सध्या, तो दिल्लीत खासदार आहे तर काही वाहिन्यांसाठी समालोचकाची भूमिका देखील पार पाडतो.
२) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
आशिया चषक २०१२ मध्ये सचिनने भारतासाठी दुसर्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या. परंतु, त्याचा शानदार खेळ टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवू शकला नाही. सचिनने तीन सामन्यात ५७.३३ च्या सरासरीने १७२ धावा केल्या होत्या.
या स्पर्धेनंतर, तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि फक्त कसोटी क्रिकेटवर त्याने लक्ष केंद्रित केले. नोव्हेंबर २०१३ मध्ये त्याने मुंबईच्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना खेळल्यावर क्रिकेटला अलविदा केला.
सध्या सचिन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी आयकॉन ही भूमिका पार पडतो.
३) विराट कोहली (Virat Kohli)
सचिनच्या अंतिम एकदिवस सामन्यावेळी, विराट कोहली हा भारतासाठी एक उभरता तारा होता. त्यानंतर, तो खेळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली कामगिरी सुधारत गेला. त्या सामन्यात, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांसह कोहलीने आक्रमक शतक झळकावत सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. त्याने १२३.६४ च्या स्ट्राईक रेटने १८३ धावा फटकाविल्या आणि ३३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला विजयाच्या जवळ आणले. त्याच्या खेळीत २२ चौकार व १ षटकाराचा समावेश होता. विजयासाठी १२ धावा आवश्यक असताना तो बाद झाला.
आत्ता, कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार आहे. शिवाय, सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळपास आलाय. आतापर्यंत त्याच्या नावावर ४३ एकदिवसीय शतके आहेत.
४) रोहित शर्मा (Rohit Sharma)
त्या मॅचमध्ये, रोहित शर्मानेही चांगली खेळी केली होती. त्याने ८३ चेंडूंत ६८ धावा केल्या आणि तिसर्या विकेटसाठी कोहलीबरोबर १७२ धावांची भागीदारी केली. त्यावेळी तो भारतासाठी मधल्या फळीत फलंदाजी करत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये सलामीवीर म्हणून बढती मिळाल्यानंतर रोहित शर्माने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. मर्यादित षटकांच्या सामन्याचा तो बादशहा बनलेला आहे.कोहलीच्या अनुपस्थित २०१८ च्या आशिया चषक जिंकणाऱ्या संघाचा तो कर्णधार होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली चार विजेतेपदे मिळवली आहेत.
५) सुरेश रैना (Suresh Raina)
आशिया चषक २०१२ मध्ये सुरेश रैना भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य अंग होता. तो संघासाठी धोनीसमवेत फिनिशरची जबाबदारी पार पाडत. याव्यतिरिक्त, त्याचे क्षेत्ररक्षणदेखिल उत्कृष्ट होते.
टी२० विश्वचषक २०१६ नंतर त्याची कामगिरी ढासळत गेली. त्याला संघातून वगळण्यात आले. उत्तर प्रदेशच्या या क्रिकेटपटूला २०१८ मध्ये पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, परंतु हे पुनरागमन फार काळ टिकले नाही. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो क्रिकेट पासून दूर आहे. रैनाने भारतीय संघातील आपले स्थान पूर्णपणे गमावले आहे. सध्या तो फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करतो.
६) एमएस धोनी (MS Dhoni)
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ जिंकला. २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याने संघाला ट्रॉफी दिली होती. सर्वांना आशा होती की, भारत नक्कीच एशिया कप २०१२ जिंकेल. परंतु, यावेळी गोष्टी भारताच्या बाजूने घडल्या नाहीत.
धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१५ आणि आयसीसी विश्वचषक टी -२० २०१६ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली पण विजेतेपद दूर राहिले. जानेवारी २०१७ मध्ये धोनीने आपले कर्णधारपद सोडले आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळू लागला. यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. चेन्नईने २०१८ त्या आयपीएलचे जेतेपद धोनीच्या नेतृत्वात जिंकले.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला. तो धोनीचा कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. त्याने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
७) युसुफ पठाण (Yusuf Pathan)
फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्याच्या निरंतर कामगिरीने त्याला या स्पर्धेत स्थान दिले गेले. परंतु, या स्पर्धेमधील त्याच्या कुचकामी कामगिरीने आपले भारतीय संघातील स्थान गमावले.
युसूफ पठाणने भारतासाठी २२ टी२० सामन्यांत त्याने १३ बळी आणि २३६ धावा केल्या आहेत. ५७ एकदिवसीय सामन्यात त्याने ३३ विकेट्स घेत ८१० धावा जमविल्या. तसेच गेल्या २ आयपीएल हंगामात त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. अखेर त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
८) इरफान पठाण (Irfan Pathan)
मोठा भाऊ युसूफ पठाण प्रमाणेच, २०१२ हे वर्ष इरफान पठाणसाठी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे वर्ष होते. मात्र, त्याने युसुफपेक्षा जास्त सामने खेळले. आशिया चषकानंतर त्याने त्यावर्षी टी -२० वर्ल्डकप खेळला.
उत्तरोत्तर इरफानची कामगिरी घसरत गेली. घरेलू क्रिकेट तो खेळत असत परंतु राष्ट्रीय संघाची दारे त्याच्यासाठी बंद झाली होती. साल २०१७ नंतर, तो आयपीएलमध्ये देखील निवडला गेला नाही.
जानेवारी २०२० मध्ये त्याने सर्व स्तरावरील क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. पठाण, अलीकडेच रोड सेफ्टी सिरीज २०२० मध्ये खेळताना दिसला. स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमध्ये अनेकदा समालोचक आणि क्रिकेटतज्ज्ञ म्हणून काम करताना आपल्याला दिसतो.
९) रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)
रविचंद्रन अश्विन आशिया चषक २०१२ मध्ये संघाचा प्रमुख फिरकीपटू होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघात तो एकमेव नियमित फिरकीपटू होता. दहा विकेट्सच्या कोट्यात त्याने एक विकेट घेऊन अवघ्या ५६ धावा दिल्या होत्या.
साल २०१७ मध्ये कॅरेबियन दौऱ्यानंतर त्याने मर्यादित षटकांच्या संघातील स्थान गमावले. कसोटी क्रिकेटमध्ये तो आपले स्थान कायम राखून आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच अश्विनने आयपीएलमध्ये दोन वर्ष पंजाब संघाची धुरा वाहिली. सध्या तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आहे.
१०) प्रवीण कुमार (Praveen Kumar)
साल २००९ ते २०११ च्या अखेरपर्यंत तो भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य होता. झहीर खान आणि आशिष नेहरा यांच्या साथीने प्रवीणने संघाची वेगवान गोलंदाजीची बाजू मजबूत ठेवली होती. रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने, केव्हिन पीटरसन या प्रख्यात फलंदाजांना प्रवीणच्या चेंडूंचा सामना करण्यात अडचण येत.
साल २०११ मध्ये तो आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होता. परंतु, आपल्या बेशिस्त वर्तणुकीने तो नेहमीच चर्चेत असत. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यात त्याने चाहत्यांचा अनादर केला. त्यानंतर भारतीय संघात आपले स्थान कायम राखण्यासाठी या वेगवान गोलंदाजाला अडचणीचा सामना करावा लागला. अखेर २०१२ नंतर त्याला संघातून वगळण्यात आले.
प्रवीणने भारतासाठी सहा कसोटी सामने, ६८ एकदिवसीय आणि दहा टी -20 सामने खेळले. प्रवीण कुमारने २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याला जानेवारी २०२० मध्ये दुबईत टी१० स्पर्धा खेळताना पाहिले गेले.
११) अशोक दिंडा (Ashoke Dinda)
आशिया चषक २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशोक दिंडाही खेळला होता. तो संघात होता हे फारच कमी लोकांना माहित असेल. आठ षटकांच्या गोलंदाजीत दिंडाने ४७ धावा देत तीन गडी बाद केलेले. त्या सामन्यात तो एक किफायतशीर गोलंदाज होता.
संपूर्ण २०१२-२०१३च्या हंगामात तो संघात आत-बाहेर होत राहिला. तरुण वेगवान गोलंदाज आल्याने वाढलेल्या स्पर्धेत तो टिकू शकला नाही.२०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध राजकोट वन डे खेळल्यानंतर त्याला आपले स्थान गमवावे लागले.
तो २०१८-१९ च्या हंगामात घरगुती क्रिकेटमध्ये बंगालचा नियमित खेळाडू होता. तथापि, २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरगिजंटसाठी अखेरचा हंगाम खेळल्यानंतर तो आयपीएलमधून बाहेर पडला. तसेच त्यानेही काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनच्या काळात केली कठोर मेहनत, आता मिळत आहेत फळे! अश्विनने उलगडले ४०० बळींमागील रहस्य
पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही प्रतिभेचा ठसा उमटवणारे सरनदीप सिंग
ब्रेकिंग! भारताच्या २ विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला युसुफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त