2011 चा आयसीसी विश्वचषक भारतीय संघाने जिंकल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला भारतीय संघातील खेळाडूंनी खांद्यावर उचलून वानखेडे स्टेडियमवर फेरी मारली होती. या क्षणाला मागील ‘दोन दशकातील लॉरियस क्रिडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षण'(Laureus Sporting Moment Award 2000-2020) हा पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार सचिनने बार्लिन येथे झालेल्या लॉरियस क्रिडा पुरस्कार सोहळ्यात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार स्टिव्ह वॉच्या हस्ते स्विकारला. यावेळी विजेत्या सचिनच्या नावाची घोषणा दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर यांनी केली.
हा पुरस्कार सचिनने भारताला, संघसहकाऱ्यांना, चाहत्यांना आणि त्याच्या शुभचिंतकांना समर्पित केला आहे. याबद्दल सचिनने खास ट्विट केले.
सचिनने ट्विट केले की ‘सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आभार. मी हा पुरस्कार भारताला, माझ्या सर्व संघसहकाऱ्यांना, चाहत्यांना आणि शुभचिंतकांना समर्पित करतो.’
https://twitter.com/sachin_rt/status/1229638511109853184
लॉरियस क्रिडा पुरस्कार सोहळ्यात 2011 च्या विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेतलेला क्षण सर्वाधिक मतांनी विजयी ठरला आहे. मागील अनेक दिवसांपासून या पुरस्कारासाठी मतदान सुरु होते. तसेच 2011 विश्वचषकातील या क्षणाला ‘कॅरिड ऑन द शोल्डर ऑफ अ नेशन’ असे नाव देण्यात आले होते.
https://twitter.com/LaureusSport/status/1229486375059283970
2011 चा विश्वचषक सचिनच्या कारकिर्दीतील सहावा आणि शेवटचा विश्वचषक होता. त्याने त्याआधी 1992, 1996, 1999, 2003 आणि 2007 असे 5 विश्वचषक खेळले होते. पण या विश्वचषकांमध्ये भारतीय संघाला विजेतेपद जिंकण्यात अपयश आले होते. पण 2011 ला भारतीय संघाने विश्वचषक जिंकून सचिनला सर्वोत्तम भेट दिली होती आणि सचिनचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न पुर्ण केले होते.






