मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना अनेक विक्रम केले आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यात ४८.५२ च्या सरासरीने ३४३५७ धावा आहेत. सचिनने फलंदाजीबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१ विकेट्सही घेतल्या आहेत.
मात्र असे असले तरी सचिनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र गोलंदाजीत खूप मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या कारकिर्दीत केवळ २ विकेट्स घेतल्या. या दोन्ही विकेट्स त्याने बडोदा संघाविरुद्ध घेतल्या आहेत. त्याने १९९५-९६ च्या रणजी ट्रॉफीच्या मोसमात तुषार आरोठेला बाद केले होते.
आरोठे यांनी १९८५-८६ च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी त्यांचे देशांतर्गत क्रिकेटमधील बरेच सामने बडोदा संघाकडून खेळले. ते बडोद्याकडून १०० पेक्षा अधिक प्रथम श्रेणी सामने खेळणारे पहिले खेळाडू होते. पण त्यांना कधीही भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
आरोठे यांनी ११४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्यांनी ३७.२२ च्या सरासरीने ६१०५ धावा केल्या असून यात १३ शतकांचा आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी २२५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ५१ अ दर्जाचे सामने खेळले असून यात ५ अर्धशतकांसह १०३७ धावा आणि ३० विकेट्स घेतल्या आहेत.
निवृत्तीनंतर आरोठे प्रशिक्षण क्षेत्रात उतरले. त्यांनी एप्रिल २०१७ ते जून २०१८ दरम्यान भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याचबरोबर आरोठे यांच्यावर २०१९मध्ये आयपीएल सामन्यांवर बेटिंग लावल्याचेही आरोप झाले होते. त्यांना बडोदा पोलिसांनी अटक केली होती.
सचिनने आरोठेनंतर वेगवान गोलंदाज झहिर खानला २०००-०१ च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत बाद केले होते. त्यावेळी झहिर बडोदाकडून खेळत होता. झहिरने मुंबई संघात स्थान न मिळाल्याने १९९९-०० मध्ये बडोद्याकडून खेळायला सुरुवात केली होती. २००६ नंतर तो मुंबई संघाकडून खेळायला लागला.
झहिरने २००० मध्ये भारताच्या संघात स्थानही मिळवले. त्याने भारताकडून खेळताना ९२ कसोटीत ३११ विकेट्स घेतल्या. तसेच २०० वनडेमध्ये २८२ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर तो १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळला. त्यात त्याने १७ विकेट्स घेतल्या. तो जोपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता तोपर्यंत तो भारतीय संघातील एक प्रमुख वेगवान गोलंदाज होता.
याबरोबर झहिर १६९ प्रथम श्रेणीचे सामने खेळला. यामध्ये त्याने ६७२ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने २५३ अ दर्जाचे सामने खळताना ३५७ विकेट्स घेतल्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
६० कसोटी सामने खेळूनही एकही मॅन ऑफ द मॅच नशीबात नसलेले क्रिकेटपटू
१० कसोटी सामने खेळूनही एकही वनडे खेळायला न मिळालेला दुर्देवी क्रिकेटपटू
ठरलं तर! क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेल्या टी२० विश्वचषकाचा निर्णय होणार या दिवशी






