भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने आंतरराष्ट्रीय स्तरातून निवृत्ती घेऊन 9 वर्ष झाली आहेत. असे असले तरी फलंदाजी करताना आजही त्याच्यात ती चमक दिसून येत आहे. आजही त्याच्या बॅटला तेवढीच धार आहे. सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिनने टी20 क्रिकेटसारखी खेळी केली आहे, ज्याने युवा खेळाडूंना देखील काही शिकवण मिळेल. त्याने या सामन्यात चौफेर दिशेने चेंडू टोलवत 200 स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 च्या हंगामात सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) हा इंडिया लिजेंड्स या संघाचा कर्णधार आहे. डेहराडून येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. अशावेळी सचिनने नमन ओझासोबत फलंदाजीला येताना 200च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. या मालिकेत सचिन चांगलाच लयीत दिसत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 धावा केल्या. तसेच न्यूझीलंड विरुद्ध 13 चेंडूत 19 धावा करताना त्याने 4 चौकार देखील फटकारले. यामध्ये शेन बॉण्डला मारलेल्या पुल शॉट आणि बॅकफुट पंचचा देखील समावेश आहे.
सचिनने या डावाची सुरूवात चौकाराने केली. त्यानंतर त्याने पुढच्याच षटकात क्रिस ट्रेमलेट याच्या गोलंदाजीवर 6, 6, 4 धावा केल्या. यावेळी सचिनने पुढे येत ट्रेमलेटच्या डोक्यावरून षटकार खेचला. त्याच्या खेळीतील काही शॉट्स पाहून 1998 शारजाहच्या सामन्याची आठवण येते. तेव्हा त्याने माइकल कैस्प्रोविच याला असाच षटकार मारला होता.
https://twitter.com/ashu112/status/1573002274376339456?s=20&t=h7YN7xCAMPo-WL5BMGlWvw
सचिनने पुढे आणखी एक षटकार मारला, त्याने 19 चेंडूत 40 धावा केल्या. त्याला क्रिस स्कॉफील्ड याने झेलबाद केले. यावेळी युवराज सिंग यानेही 206च्या स्ट्राईक रेटने खेळताना 15 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि 3 षटकार मारले तर इंडिया लिजेंड्सने 15 षटकात 5 विकेट्स गमावत 170 धावासंख्या उभारली. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 130 धावाच करू शकला. यामुळे इंडियाने हा सामना 40 धावांनी जिंकला आणि सचिनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
बाबर आझमने शतक करताच केली रोहितची बरोबरी, विराट कोहलीचा ‘तो’ विक्रमही मोडीत