भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटवर २४ वर्ष अधिराज्य गाजविणाऱ्या सचिनने क्रिकेटला अलविदा करुन जवळपास ७ वर्ष झाली. सचिनचा २००वा कसोटी सामना हा मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी झाला. क्रिकेटमधील एक दंतकथा बनलेल्या भारताच्या या महान खेळाडूचा तो शेवटचा सामना पहायला भारत काय जगातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
परंतु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या आईने पाहिलेला सचिनचा हा पहिलाच सामना होता, असे कुणी सांगितले तर क्रिकेट चाहते सोडाच सचिन फॅन्सचाही विश्वास बसणार नाही.
सचिनची आई रजनी तेंडूलकर यांनी त्या दिवसापुर्वी सचिनचा कोणताही सामना पाहिला नव्हता. जेव्हा हा सामना सुरु होणार होता, त्यापुर्वी काही दिवस आधी सचिननेच आईला हा सामना पाहण्याचा आग्रह केला होता. तसेच यासाठी वानखेडेवर खास व्यवस्थाही करण्यात आली होती.
“हा सामना मुंबईत घेण्याचे एक कारण म्हणजे माझ्या आईने मला कधीही मैदानावर क्रिकेट खेळताना पाहिले नव्हते. मी जेव्हापासून स्कुल क्रिकेट खेळतोय तेव्हापासून आईने कधीही कोणता सामन्याला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मीच आईला म्हटले की गेली ३० वर्ष मी नेहमी घराबाहेर का असतो याच कारण तरी पाहण्यासाठी तू हा सामना पहायला ये.” असे सचिनने त्यानंतर एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
“या सामन्यावेळी आईची बसण्याची सर्व तयारी करण्यात आली होती. ती तेव्हा प्रेसिडेंट बाॅक्समध्ये बसली होती. माझे काही जवळचे मित्र तिच्या आजूबाजूला होते. जेव्हा विंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी आईला घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु माझ्या एका मित्राने सांगितले की सध्या विंडीज ज्या प्रकारे खेळत आहे त्यामुळे एखाद्यावेळी भारताला आजच फलंदाजीची संधी मिळू शकते. आणि खरोखर तसेच घडलेही. ”
या सामन्यात पहिल्याच दिवशी (१४ नोव्हेंबर) विंडीजचा संघ १८२ धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे भारतीय संघाचेही पहिल्याच दिवशी २ फलंदाज बाद झाले. यामुळे सचिनला फलंदाजीची संधी मिळाली. या दिवशी सचिनने २०-२५ मिनीटं फलंदाजी केली आणि यात नाबाद ३८ धावा केल्या.
“मी पहिल्या दिवशी अंदाजे २०-२५ मिनीटं फलंदाजी केली. शेवटचे षटकं सुरु होतं तोपर्यंत सर्वकाही ठीक होतं. डॅरेन सॅमी हा गोलंदाजी करणार होता. तो रनअपवर आला होता. तेवढ्यात स्टेडियमवरील स्क्रीनवर मी आईला पाहिले. तो माझ्यासाठी सर्वात भावनिक क्षण होता. आईला मोठ्या स्क्रीन दाखविण्यात आले आहे हे तिच्याही लक्षात आले. हे सर्व तिच्यासोबत पहिल्यांदा होत होते,” असेही सचिन पुढे म्हणाला.
यावेळी सचिनने खेळावरच लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. सचिन म्हणतो, “यावेळी मला भावनिक होऊन चालणार नव्हते. तेव्हा मोठ्या स्क्रीनवर आई पाठोपाठ अंजलीला दाखविण्यात आले. नंतर एक एक करत संपुर्ण परिवाराला दाखविण्यात आले. हा माझ्यासाठी खूपच भावनिक क्षण होता. परंतु मी भावनांना आवर घातला. नाहीतर माझी विकेट संघासाठी महागात पडली असती.”
वाचा-
–क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा झालेली ती शुन्य धावेची खेळी
-टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू